बदलापूर : येत्या तीन ते चार महिन्यात बदलापूर नगरपालिकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. कारण बदलापूर नगरपालिकेच्या प्रभाग रचनेसंदर्भातील आदेश नगरपालिकेला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. आपला प्रभाग राहणार की नवा प्रभाग शोधावा लागणार याचे टेन्शन असले तरी २०२२ चीच प्रभाग रचना कायम राहण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच सर्व नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर निवडणूक आयोग तयारीला लागले. त्यानुसार बदलापूर नगरपालिकेला नवीन प्रभाग रचने संदर्भातील आदेश प्राप्त झाले आहेत. बदलापूर नगरपालिकेत २०२२ च्या प्रभाग रचनेनुसार सध्या ४९ प्रभाग आहेत. यापूर्वी ४७ प्रभाग होते त्यात दोन प्रभागांची वाढ झाली आहे.
आता पुन्हा नव्याने प्रभागरचनेसंदर्भातील आदेश प्राप्त झाल्यामुळे आपला प्रभाग बदलणार की तोच राहणार यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मात्र असे असले तरी सुद्धा २०२२ला घोषित झालेली प्रभाग रचना निवडणुकीसाठी लागू होईल ही शक्यता जास्त आहे.
कोरोनाच्या पूर्वीच बदलापूर नगरपालिकेची मुदत संपली होती. एप्रिल २०२० पासून बदलापूर नगरपालिकेत प्रशासकीय राजवट असून लवकरात लवकर निवडणुका व्हाव्यात अशी सर्वपक्षीय स्थानिक कार्यकर्त्यांच्या आणि आजी-माजी नगरसेवकांची इच्छा आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर तरी निवडणुका लवकरात लवकर होणार का, हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यातच आता प्रभाग रचनेचे आदेश आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये हुरूप वाढला आहे.