बदलापूर: बदलापूर पूर्वेतील राऊत चौक परिसरातील फ्लिपकार्ट मिनिट्सच्या आउटलेटवर अन्न व औषध प्रशासनाने एफडीएची मोठी कारवाई करत शाखेचा परवाना निलंबित केला आहे. ग्राहकाला बुरशी लागलेला पिझ्झा बेस पुरविल्याची तक्रार आल्यानंतर एफडीएने रविवारी संध्याकाळी गोदामावर छापा टाकला.
तब्बल २४ तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या तपासणीत बुरशीयुक्त तसेच मुदतबाह्य खाद्यपदार्थ आढळून आले. याशिवाय स्वच्छतेचे नियम आणि अन्नसुरक्षा मानक कायद्याचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर परवाना निलंबित करण्यात आला, अशी माहिती अन्नसुरक्षा अधिकारी अरुणा वीर-कायदे यांनी दिली.
या प्रकरणाची सुरुवात बदलापूर पूर्वेतील रहिवासी व मनसेचे पदाधिकारी सिद्धांत रोठे यांनी केलेल्या तक्रारीतून झाली. त्यांनी आपल्या मुलासाठी फ्लिपकार्ट मिनिट्समधून पिझ्झा बेस आणि घरगुती साहित्य मागविले होते.
एक पिझ्झा तयार केल्यानंतर दुसरा पिझ्झा बेस वापरताना त्यावर बुरशी आढळल्याने त्यांनी तत्काळ आउटलेटमध्ये जाऊन संबंधितांना हा प्रकार दाखवून दिला. मात्र दोष मान्य करून माफी मागण्याऐवजी कर्मचाऱ्यांनी उद्धट व अरेरावीची वागणूक दिल्याचा आरोप रोठे यांनी केला.
यानंतर मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हे प्रकरण थेट अन्न व औषध प्रशासनापर्यंत पोहोचविले. मनसेच्या पाठपुराव्यानंतर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी रविवारी संध्याकाळी छापा टाकून सर्व खाद्यपदार्थांची सखोल तपासणी केली.
सोमवारी दुपारपर्यंत सुरू असलेल्या कारवाईदरम्यान अनेक खाद्यपदार्थांवर बुरशी आढळली, काही वस्तूंची मुदत संपलेली असल्याचे निदर्शनास आले, तर स्वच्छतेचे नियमही धाब्यावर बसविल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कंपन्यांवर केवळ तात्पुरती नव्हे तर कायमस्वरूपी कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेचे शहरप्रमुख निशांत मांडवीकर यांनी केली आहे. हे प्रकरण वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचल्यानंतर संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार, सर्व कायदेशीर अटींची पूर्तता होईपर्यंत फ्लिपकार्ट मिनिट्सच्या संबंधित शाखेचा परवाना निलंबित करण्यात आला आहे, असे एफडीएने स्पष्ट केले.