ठाणे : दिल्ली स्फोटाच्या घटनेनंतर देशभरात छापेमारी सुरू करण्यात आली आहे. या कारवाईंतर्गत दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या एका प्राध्यापकाच्या घरासह ‘एटीएस’ पथकाने मुंब्य्रात चार घरांवर मंगळवारी रात्री उशिरा छापेमारी केली. त्यात दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. इब्राहिम आबादी असे दोघांपैकी एका संशयिताचे नाव आहे.
काही संशयास्पद दस्तावेज, हार्डडिस्क, लॅपटॉप व इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या. आबादी मुंब्य्रातील कौसा भागात एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहतो. तो दर रविवारी कुर्ल्याच्या एका मस्जिदीमध्ये उदूर्र् शिकवण्यासाठी जात होता. कुर्ल्यात त्याची दुसरी पत्नी राहत असून, तिच्या घरीही ‘एटीएस’ पथकाने छापेमारी केली आहे. आबिदीचे नाव पुण्यातून अटक करण्यात आलेल्या जुबेर इलियास हंगरगेकर या सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या संशयित आरोपीच्या चौकशीतून पुढे आले होते. त्यानंतर मंगळवारी रात्री ‘एटीएस’ पथकाने त्याच्या मुंब्य्रातील घरावर छापा टाकून त्यास ताब्यात घेतले. तो मस्जिदमध्ये उर्दू शिकवण्याच्या नावाखाली दहशतवादी विचारधारा शिकवत होता, असा तपास यंत्रणांना संशय आहे. दरम्यान, आपल्या पतीचा कोणत्याही दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग नाही, अशी प्रतिक्रिया आबिदीच्या पत्नीने माध्यमांशी बोलताना दिली.
‘अल-कायदा’ कनेक्शन
इब्राहिम आबादी हा कुख्यात दहशतवादी संघटना ‘अल-कायदा इन इंडियन सबकाँटिनेन्ट’शी संबंधित आहे, अशी माहिती तपासातून समोर येत आहे. या संघटनेशी संबंधित नेत्यांची भाषणे व इतर पत्रके त्याच्या घरात आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे पोलिस अलर्ट
देशभरातील देशविघातक कारवायांमध्ये मुंब्रा, भिवंडी, कल्याण येथील काही कट्टरपंथी विचारधारेच्या लोकांचा सहभाग वेळोवेळी समोर आला आहे. 2014 पासून 2024 पर्यंत ठाणे जिल्ह्यातून 60 पेक्षा जास्त संशयित दहशतवादी पकडण्यात आले आहेत.
कोंढवा परिसरातही छापे
पुणे : राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पुण्यातील कोंढवा भागात छापे टाकून काही संशयितांची चौकशी केली. कोंढव्यातून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांकडून मोबाइल, इलेक्ट्रॉनिक साधने जप्त करण्यात आली. दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या अभियंता जुबेर हंगरगेकर एटीएसने पुणे रेल्वे स्थानक परिसरातून नुकतीच अटक केली. जुबेर मूळचा सोलापूरचा आहे. त्याच्याविरुद्ध बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यान्वये (यूएपीए) गुन्हा दाखल करण्यात आला.
जुबेरच्या संपर्कातील 18 जणांकडे चौकशी
जुबेरच्या संपर्कात असलेल्या 18 जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्यापैकी काही जण बंदी घातलेल्या संघटनेच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे.