डोळखांब: तानसा अभयारण्यातील तानसा वनपरिक्षेत्रात पाणवठ्यावर प्रतिवर्षीप्रमाणे बुद्ध पौर्णिमेच्या रात्री वन्य प्राण्यांची प्रगणना उप वनसंरक्षक राहुल गवई वन्यजीव विभाग ठाणे आणि सहाय्यक वनसंरक्षक दत्तात्रेय मिसाळ तानसा अभयारण्य यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तानसा वनपरिक्षेत्रातील साखरोली, केळीचे पाणी, बोरद्यायचे पाणी, आघई पाझर तलाव, वेडवहाळ वनमोरी नाला या पाणवठ्यावर माकड, वानर, भेकर, चौसिंगा, साळिंदर, डुक्कर, मुंगूस, ससा, जंगली मांजर, उदमांजर, खार, उडणारी खार, वटवाघुळ - कोल्हेतोंडी, वटवाघुळ - कीटकभक्षी इत्यादी सस्तन प्राणी यांचे रात्री आवाज ऐकले तर जाताना येताना ठसे निदर्शनास आले तर काही ठिकाणी लांबून प्राणी दिसून आले.
धामण, दिवड, घोणस, पाल, सरडे, बेडूक इत्यादी सापडणारे प्राणी दिसून आले. समवेत रात्री चट्टेरी वन घुबड, टिपकेवाला पिंगळा, जंगली पिंगळा, गव्हाणी घुबड यांचे आवाज ऐकू आले तर सकाळी ब्लॅकबर्ड, नीलिमा, नीलमणी, नीलिमा, होला, सह्याद्रीचा सूर्यपक्षी, निळा सूर्यपक्षी, फुलटोचा, काळटोप हळद्या, पावशा, घिगिर्वा/भेरा, भृंगराज, मोरघी, तुरेवाला सर्पगरुड, मोर, घार, ककोत्री, कोतवाला, नाचण, टिपकेवाला होला, नारंगी डोक्याचा कस्तुर, डोमकावळा, सुतारपक्षी, मराठा सुतार, खडक पाकोळी, सातभाई असे पक्षी सकाळी व रात्री मचाण परिसरात दिसून आले.
वन कर्मचारी यांचे सोबतीने स्थानिक निसर्गप्रेमींनी देखील हा आगळा वेगळा ‘निसर्गानुभव’ घेतला या माध्यमातून आपल्या तानसा वनपरिक्षेत्रात वन्यजीवांची रेलचेल दिसून आली. वनपरिक्षेत्र अधिकारी या नात्याने आम्ही देखील या प्राणी गणनेचा अनुभव घेतला.- गणेश परहर, वनपरिक्षेत्र अधिकारी तानसा, तानसा अभयारण्य
बुद्ध पौर्णिमेनिमित्त दरवर्षी अभयारण्यातील वन कर्मचारी अगोदरच पाणवठ्याच्या परिसर भागात मचाण तयार करून ठेवतात. ज्यामुळे वन कर्मचारी यांचे समवेत आम्हा निसर्गप्रेमींना देखील हा ‘निसर्गानुभव’ घेता येतो. यामुळे वन व वन्यजीव संवर्धन करण्यासाठी मदत होते.- रोहिदास डगळे, माजी राज्य वन्यजीव मंडळ सदस्य-महाराष्ट्र, तानसा वन्यजीव सल्लागार समिती सदस्य