Crime News pudhari photo
ठाणे

Angadia Robbery: ‘आम्ही क्राईम ब्रँचचे!’ म्हणत अंगडियाची व्हॅन पळवत ६१ लाख लुटले

मुंबई-नाशिक महामार्गावर खर्डीत दरोडा; एक पोलीस कर्मचारीच टोळीत सहभागी

पुढारी वृत्तसेवा

कसारा: मुंबई-नाशिक महामार्गावर पोलिसांच्या वर्दीचा धाक दाखवत अंगडिया कंपनीच्या वाहनावर दरोडा टाकून तब्बल ६१ लाख ५० हजार रुपयांची रोकड लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खर्डी गावाच्या हद्दीत मध्यरात्री घडलेल्या या थरारक घटनेत दरोडेखोरांनी अंगडिया कंपनीच्या व्हॅनचा पाठलाग करून ती अडवली.

त्यानंतर चालक आणि त्याच्या साथीदाराला ‘आम्ही क्राईम ब्रँचचे पोलीस आहोत’ असे सांगत वाहनाची चावी हिसकावून घेतली. दोघांना व्हॅनमध्ये डांबून बेदम मारहाण केली आणि तब्बल एक कोटी रुपयांच्या रोकडीतून ६१ लाख ५० हजार रुपये लुटून पोबारा केला.

या प्रकरणाच्या तपासात सर्वात धक्कादायक बाब समोर आली असून, या दरोड्यात ठाणे ग्रामीण पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी शहापूर पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली असून, या टोळीत आणखी सात ते आठ जणांचा सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे.

ही घटना २३ ऑगस्टच्या मध्यरात्री ते २४ ऑगस्टच्या पहाटेच्या सुमारास मुंबई-नाशिक महामार्गावरील खर्डी गावाच्या हद्दीत घडली. तक्रारदार गोविंद हरगोविंदभाई पटेल (वय ४३, रा. अलथान, सुरत, गुजरात) हे मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथे वास्तव्यास असलेल्या प्रविणभाई यांच्या के. पी. अंगडिया कंपनीत व्हॅनचालक म्हणून काम करतात.

नेहमीप्रमाणे ते २३ ऑगस्ट रोजी ग्वाल्हेर येथून मुंबईतील मालाड परिसरातील कार्यालयात पोहोचवण्यासाठी तब्बल एक कोटी रुपयांची रोकड घेऊन साथीदार जिगरभाई पटेल यांच्यासह मुंबईच्या दिशेने निघाले होते. प्रवासादरम्यान त्यांनी मुंबई-नाशिक महामार्गावरील खर्डी येथे वाहन थांबवून रात्रीचे जेवण केले. त्यानंतर २४ ऑगस्ट रोजी पहाटे सव्वा एकच्या सुमारास दोघे पुढील प्रवासासाठी व्हॅन घेऊन निघाले.

त्याच वेळी काही इसमांनी त्यांच्या व्हॅनची काच ठोठावून वाहन थांबवण्यास सांगितले. चालकाने काच उघडताच, ‘आम्ही क्राईम ब्रँचचे पोलीस असून चौकीत चला,’ असे सांगत दरोडेखोरांनी पोलिसांचा धाक दाखवला.

क्षणाचाही विलंब न करता त्यांनी व्हॅनची चावी हिसकावून घेतली. त्यानंतर गोविंद पटेल आणि जिगरभाई यांना व्हॅनच्या मधल्या सीटवर बसवून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. दरोडेखोरांनी व्हॅन ताब्यात घेत ती नाशिकच्या दिशेने नेली. काही अंतर गेल्यानंतर त्यांनी पुन्हा व्हॅन मुंबईच्या दिशेने वळवली.

दरम्यान, मुंबई-नाशिक महामार्गावरील एका बंद हॉटेलजवळ व्हॅन थांबवण्यात आली. तेथे चालक आणि त्याच्या साथीदाराला पुन्हा बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर व्हॅनमध्ये ठेवलेल्या एक कोटी रुपयांच्या रोकडीतून तब्बल ६१ लाख ५० हजार रुपये काढून घेण्यात आले. रोकड लुटल्यानंतर दरोडेखोरांनी दुसऱ्या पांढऱ्या रंगाच्या कारमधून घटनास्थळावरून पलायन केले.

या घटनेनंतर तक्रारदार गोविंद पटेल यांनी शहापूर पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात दरोडेखोरांविरोधात फिर्याद दिली. दरोडेखोरांपैकी एक जण पोलिसांच्या वर्दीत होता, तर काही जण स्वतःला पोलीस असल्याचे सांगत होते, अशी माहिती तक्रारीत देण्यात आली होती.

तक्रारदाराने दरोडेखोरांचे वर्णनही पोलिसांना दिले. या प्रकरणाचा पुढील तपास शहापूर पोलीस करीत असून, फरार आरोपी आणि लुटीची उर्वरित रोकड शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

तरीही पोलीस दलातच कार्यरत...

अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर यापूर्वीही अनेकदा कारवाई झाल्याचे समोर येत आहे. सदर पोलीस कर्मचारी सध्या कसारा चिंतामणवाडी चौकीवर कार्यरत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पोलिसांच्या वेशात दरोडा टाकणाऱ्या टोळीमध्ये पोलीस कर्मचारीच सहभागी असल्याचे उघड झाल्याने या प्रकरणाने पोलीस दलातही खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या दरोड्यात एकूण सात ते आठ जणांचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अटक केलेल्या पाच जणांकडून पोलिसांना आणखी महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता असून, फरार आरोपींचा कसून शोध सुरू आहे. यातील काही आरोपी गुजरात राज्यातील असल्याचेही तपासात समोर आले आहे. त्यामुळे तपासात कमालीची गुप्तता बाळगली जात आहे.

तपासाची चक्रे वेगाने फिरली,गुजरातमधून आरोपी असल्याची शक्यता

फिर्यादीनंतर शहापूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. दरोडेखोरांनी ‘आम्ही क्राईम ब्रँचचे पोलीस आहोत’ असे सांगत पोलिस असल्याचे भासवले असल्याने पोलिसांनी विविध शक्यता पडताळून पाहण्यास सुरुवात केली. तपास पुढे जात असताना या दरोड्याचे धागेदोरे थेट ठाणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचल्याने पोलिसांनाही धक्का बसला.

तपासात दरोडेखोरांमध्ये ठाणे ग्रामीण दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास अधिक वेगाने सुरू केला. आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT