डोंबिवली : प्रसिद्ध लोकगीत, भीमगीत गायक आनंद प्रल्हाद शिंदे (६४) यांना लैंगिक शोषणाच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे २५ लाख रूपयांची खंडणी मागण्यात आली आहे. या प्रकरणी पुण्याच्या कोथरूड येथील आशाळभूत डान्सर तरूणीसह तिची आई आणि भावावर मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गायक आनंद शिंदे यांचे चिरंजीव डॉ. उत्कर्ष शिंदे यांच्या चालकामार्फत झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत तरूणीने कुटुंबीयांच्या मदतीने हे कारस्थान रचल्याचे गायक शिंदे यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे.
५० लाखांची मागणी...अन् १ लाख उकळले
गायक आनंद शिंदे हे कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या पलावा येथील कासाबेला गोल्ड येथे राहतात. तीन वर्षांपूर्वी डॉ. उत्कर्ष शिंदे यांच्या वाहनचालक अक्षय कांबळे याच्यामार्फत एक कुटुंब शिंदे यांच्या घरी आले होते. माझी मुलगी चांगली नृत्य करते, तिला संधी द्या, अशी विनंती आईने केली. त्यानंतर शिंदे यांनी त्या तरुणीला कोंबडा करतोय...आणि एडाई देवी...या भक्तिगीतांच्या चित्रीकरणात नृत्याची संधी दिली. पुणे मुळशी येथे शूटिंग झाले. आर्थिक अडचणीत असताना शिंदे यांनी तिला मदतही केली. गेल्या महिन्यात धाराशिव येथे कार्यक्रमात असताना तरुणीने ५० लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाहीत तर लैंगिक शोषणाची तक्रार करते, अशी तरूणीने धमकी दिली. त्यानंतर तिने पुणे पोलिसांकडे गायक आनंद शिंदे यांच्या विरोधात लेखी अर्ज दिला.
तक्रार मागे घेण्यासाठी फ्लॅटसह २५ लाखांचा सौदा
गायक आनंद शिंदे यांच्या मध्यस्थांनी तरुणीशी संपर्क साधला असता तक्रार मागे घ्यायची असेल तर पुण्यात फ्लॅट आणि ५० लाख रूपये द्यावे लागतील, असा निरोप दिला. पुण्यातील कोथरूड येथे अनेक बैठका झाल्या. आधी ४० लाख, त्यानंतर ३५ लाख अशी चर्चा होऊन शेवटी २५ लाखांवर तडजोड झाली. या रकमेपैकी १ लाख रूपये आगाऊ म्हणून आरोपींनी स्वीकारले. मात्र उर्वरित २४ लाख रूपयांसाठी त्यांनी तगादा लावला. पैसे नाही दिले तर तुरुंगात टाकून बदनामी करू, अशी धमकी देऊन जबरदस्तीने खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केल्याचे गायक शिंदे यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे.
गुन्हा स्थानिक पोलिस ठाण्यात वर्ग
ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाकडे आलेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. आरोपी आई, मुलगी आणि मुलगा तिघेही पाण्यातील कोथरूड परिसरातील रहिवासी आहेत. पोलिस या प्रकरणाचा चौकस तपास आहेत.