माजी खासदार आनंद परांजपे 
ठाणे

Anand Paranjpe | माजी खासदार आनंद परांजपे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम! 

स्वगृही शिवसेनेत परतणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हिरवा कंदील?

Namdev Gharal

ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये अंतर्गत गटबाजी उफाळून आली असताना पक्षाचे मुख्य प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे यांनी  पक्षाच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पाठवला आहे. ते शिवसेनेत स्वगृही परतण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे फुटल्यानंतर आनंद  परांजपे यांनी अजित पवार गटाची बाजू भक्कमपणे मांडत पक्षाला मजबुती देण्याचे काम केले. परांजपे हे शिवसेनेचे खासदार असताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का दिला होता. तेव्हापासून परांजपे हे आव्हाड यांच्यासोबत होते. त्यांना दोनदा लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांना यश आले नाही. त्यानंतर ठाणे जिल्हा अध्यक्ष, प्रवक्ते म्हणून जबाबदारी असताना परांजपे यांनी अचानक जितेंद्र आव्हाड यांची साथ सोडली आणि अजित पवार गटाची जबाबदारी सांभाळली.

त्यावेळी परांजपे यांना विधान परिषदेवर पाठविण्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिले होते. मात्र त्यांच्या नावाचा विचार न करता इतर कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली. हा प्रकार दोनदा घडल्याने परांजपे नाराज झाले होते. आता पक्षाचे कार्य अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यासह वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना राष्ट्रीय कार्यकारणीतून बाहेर ठेवण्यात आले. त्यातून पक्षातील फुटीची चर्चा रंगली आहे. अखेर आनंद परांजपे यांनी पक्षाला रामराम ठोकून आपली नवीन राजकीय दिशा ठरवली आहे. पटेल, तटकरे हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली असताना परांजपे हे स्वगृही परतण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यास शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दिल्याचे बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT