डोंबिवली : कल्याण न्यायालयात शनिवारी न्यायाधीशांच्या दिशेने आरोपीने चप्पल भिरकावल्याची एक धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे न्यायालयाला शासनाने दिलेल्या सुरक्षा व्यवस्थेवर वकील संघटनेने टीकेची झोड घेतली आहे. जिथे न्यायाधीशच जर का सुरक्षित नसतील तिथे वकिलांचे काय ? असा सवाल करत कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाची सुरक्षा रामभरोसे आल्याची व्यथा मांडून कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रकाश जगताप यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे.
असे प्रकार होऊ नयेत म्हणून शासनाने वकील संरक्षण कायदा पारित करून त्याची तात्काळ अंमलबजावणी केली पाहिजे. जेणेकरून वकिलांवरील हल्ले कमी होतील. कायद्याचा धाक निर्माण होईल. हे करत असतानाच न्यायाधीशांच्या सुरक्षेकडे सुद्धा लक्ष दिले गेले पाहिजे. न्यायदालनामध्ये जर न्यायाधीशांच्या दिशेने आरोपीकडून चप्पल भिरकावली जात असेल तर त्या न्यायालयातील सुरक्षा रक्षक पोलिस काय करतात ? किंवा काय करत होते ? आरोपीला कारागृहातून न्यायालयात आणले होते. तर आरोपी चप्पल भिरकावत असताना कारागृहाचे पोलिस काय करत होते ? शनिवारच्या प्रकारामध्ये त्या न्यायालयातील सर्व पोलिसांना तात्काळ सेवेतून निलंबित केले पाहिजे. जर न्यायाधीश सुरक्षित नसतील तर वकिलांचे काय ? असाही सवाल कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रकाश जगताप यांनी या पार्श्वभूमीवर उपस्थित केला आहे.
सहा महिन्यांपूर्वीच कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरामध्ये शस्त्र आणण्यास मनाई करण्यात आली आहे. तसे आदेश असलेले फलक न्यायालयाच्या मुख्य दरवाजाच्या बाजूला लावलेले आहेत. त्याचबरोबर जिल्हा व सत्र न्यायालयाला तीन दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाजांवर सुरक्षा म्हणून पोलिस तैनात केले आहेत. त्याचबरोबर न्यायालयाच्या जुन्या इमारतीमध्ये मेटल डिटेक्टर मशीन बसवले आहे. वास्तविक पाहता हे डिटेक्टर मशीन मुख्य दरवाजांवर बसविणे आवश्यक असताना ते फक्त न्यायालयाच्या एका इमारतीला बसवले आहेत. परंतु त्याचा काहीही उपयोग नाही. कारण या दोन्ही डिटेक्टर मशीनच्या बाजूला एकही पोलिस उपलब्ध नसतो, याकडे अध्यक्ष ॲड. प्रकाश जगताप यांनी शासनाचे लक्ष केंद्रित केले आहे.
न्यायालयाच्या मुख्य दरवाजाजवळ पोलिस चौकी आहे. मार्केटच्या बाजूकडील न्यायालयाच्या दरवाजावर पोलिसांची नियुक्ती केलेली असताना एकही पोलीस त्या ठिकाणी दिसत नाही. तसेच न्यायालयाच्या उत्तरेकडील दरवाजावर येथेही एकही पोलिस तैनात नसतो. न्यायालयाची सुरक्षा व्यवस्था जर अशी असेल तर त्या ठिकाणी बंदूकधारी व्यक्ती येऊ शकत नाहीत का ? असा सवाल अध्यक्ष ॲड. प्रकाश जगताप यांनी उपस्थित केला आहे. वास्तविक पाहता अशा शस्त्रधारी व्यक्तींकडून न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच शस्त्र काढून घेणे अत्यावश्यक आहे. परंतु आमचे पोलिस फक्त बघ्याची भूमिका घेतात. काल अर्थात शनिवारी शस्त्रधारी व्यक्ती न्यायालयातील पोलिसांच्या समोरूनच जात-येत असताना सुद्धा पोलिसांनी त्याबाबत काय कारवाई केली ? काही अघटित घडले असते तर त्याची जबाबदारी कुणाची ? न्यायालयाची की पोलिसांची ? अशा प्रश्नांची अध्यक्ष ॲड. प्रकाश जगताप यांनी सरबत्ती केली आहे. न्यायालयाने सुरक्षेचे आदेश दिले असून सुद्धा प्रत्यक्ष कृती मात्र शून्य आहे. त्याचबरोबर शनिवारी न्यायाधीशांवर आरोपीने चप्पल फेकण्याचा घृणास्पद निंदनीय प्रकार घडला, या घटनेला जबाबदार कोण ? असाही सवाल ॲड. जगताप यांनी उपस्थित केला आहे.