अंबरनाथ : अंबरनाथमध्ये 4 लाख 60 हजार लोकसंख्या गृहीत धरून 84 एमएलडी इतका पाणीपुरवठा केला जातो. मात्र गळती आणि पाणी चोरी यावर कोणताही अंकुश नसल्याने अंबरनाथकरांना पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे येथील अकार्यक्षम अधिकाऱ्यांना तात्काळ हटवा, अशी लेखी तक्रार आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे.
अंबरनाथ शहराला बॅरेज धरणातून 56, एमआयडीसीकडून 22 तर चिखलोली धरणातून 6 असे एकूण 84 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. लोकसंख्येच्या तुलनेत प्रत्येक व्यक्तीला 135 लिटर दररोज पाणी लागते. मात्र पाणी चोरी व गळती लक्ष्यात घेता साधारण 7 एमएलडी इतक्या पाण्याची कमतरता भासत असल्याने अंबरनाथकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या सगळ्या समस्यांवर सद्याचे येथील पाणी पुरवठा अधिकारी कोणताही उपाय काढत नासल्याने अश्या अधिकाऱ्यांना तात्काळ बदलण्याची मागणी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी केली आहे.
अंबरनाथमध्ये अंदाजे 35 टक्के गळती होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यात विविध भागांना दिवसातून एक ते दीड तास पाणीपुरवठा होत असून चिखलोली धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या वडवली आणि शिवाजीनगर या भागात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे रोजची पाण्याची दैनंदिन गरज पाहता नागरिकांना नाइलाजास्तव खिशाला झळ देत टँकरच्या पाण्यावर आपली गरज भागवावी लागत आहे. त्यामुळे टँकर माफियांना पोसण्यासाठी शहरात कृत्रिम पाणी टंचाई घडवून आणली जात आहे का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
अंबरनाथ शहरात ब्रिटिश कालीन जल वाहिन्या आहेत. त्यात शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्याचे काँक्रीटीकरण झाले आहे. त्यामुळे खराब झालेल्या जलवाहिन्या व लिकेज काढणे कठीण आहे. जोपर्यंत अमृत टप्पा पूर्ण होत नाही. पाण्याची कमतरता भासेल. त्यातही कधी वीजपुरवठा खंडित झाला किंवा इतर तांत्रिक कारणामुळे पाणी बंद झाले तरच पाणी टंचाई निर्माण होते. तरी देखील अधिकारी बदलून परिस्थिती बदलणार असेल तर जरूर माझी बदली करा.मिलिंद देशपांडे, कार्यकारी अभियंता, मजीप्रा