Hotel Gas Shortage Pudhari
ठाणे

Ambernath Hotel Gas Shortage: हॉटेलची मदार आता सँडविच, ज्युसवर !

अंबरनाथमध्ये हॉटेल बंद होणार; इलेक्ट्रिक शेगडीही मिळेनाशी झाली

पुढारी वृत्तसेवा

अंबरनाथ : इराण आणि इराक या देशांमध्ये पेटलेल्या युद्धाची झळ आता भारतातही पोहोचली आहे. इंधन तसेच घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तुटवड्याचा फटका अंबरनाथमधील हॉटेल व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे अंबरनाथमधील हॉटेल बंद करण्याचा निर्णय हॉटेल असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हॉटेलमध्ये गॅस नसल्याने सध्या सँडविच आणि ज्युसवर कसेबसे हॉटेल सुरू असल्याचे हॉटेल चालक सांगतात.

स्वयंपाकासाठी लागणाऱ्या सिलिंडरचा मुबलक साठा असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा अंबरनाथ शहरातही भासू लागला आहे. व्यावसायिक सिलिंडर उपलब्ध होणे पूर्णतः बंद झाल्याने हॉटेल व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.

दिवसाला तीन ते चार सिलिंडर लागत असताना सध्या एकही सिलिंडर उपलब्ध नसल्याने खाद्यपदार्थ तयार करणे पूर्णतः बंद झाले असून हॉटेलमध्ये केवळ सँडविच आणि ज्युस उपलब्ध आहे. त्यामुळे आता हॉटेल पूर्णपणे बंद करावे का, याबाबत अंबरनाथ हॉटेल असोसिएशनची बैठक होऊन त्यात निर्णय घेण्यात येणार असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष दिवाकर कांचन यांनी सांगितले.

अंबरनाथमध्ये साधारण ३५ हॉटेल्स आहेत. त्यामुळे हॉटेल बंदचा फटका नागरिकांना बसणार आहेच. तसेच हॉटेलमधील कामगारांच्या पगाराचाही प्रश्न त्यानिमित्ताने समोर येणार आहे.

हॉटेल व्यावसायिक पुरते हतबल

एमआयडीसीमधील कंपन्यांच्या कॅन्टीनमध्ये महानगर गॅसची पाईपलाईन गॅस सुविधा आहे. मात्र त्यांनाही रोजच्या वापरात ३० टक्के कपात करण्याच्या सूचना महानगर गॅसकडून देण्यात आल्या आहेत. आठवड्याभरात हा फरक न दिसल्यास त्यांचे कनेक्शन कायमचे बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक पुरते हतबल झाले असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष दिवाकर कांचन यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT