अंबरनाथ : भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवण्यात अंबरनाथ नगरपालिका पुरती अपयशी ठरली असताना आता श्वान निर्बीजीकरण केंद्र देखील बंद असल्याने अंबरनाथ शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून, मागील दहा महिन्यात तब्बल 5920 श्वान दंश झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
अंबरनाथ शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्याचा त्रास अंबरनाथकरांना सहन करावा लागत आहे. यंदाच्या जानेवारी ते ऑक्टोबर 2025 या वर्षी भटक्या कुत्र्यांनी तब्बल 5920 जणांना चावा घेतला असल्याने चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करून त्यांची संख्या नियंत्रणात आणण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र निर्बीजीकरण केंद्र मागील काही महिन्यांपासून बंद असल्याने भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे.
अंबरनाथ नगरपालिकेने अलीकडेच निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केंद्रासाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यासाठी संबंधित संस्थेला, भटक्या श्वानांवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करणे व त्यांना रेबीज प्रतिबंधक लस टोचणे यासाठी प्रति श्वान -1450 प्रती श्वान, जखमी, पिसाळलेल्या श्वानांवर उपचार करणे, प्रति श्वान 590 रुपये, भटक्या श्वानांना फक्त रेबीज प्रतीबंधक लस टोचणे प्रति श्वान 300 रुपये, प्रभाग निहाय रेबिज लसिकरण शिबीर राबवून भटक्या श्वानांना फक्त रेबिज प्रतिबंधक लस टोचणे प्रति श्वान 100 रुपये. अंबरनाथ नगरपालिका रक्कम अदा करणार आहे. मात्र श्वान निर्बीजीकरण केंद्रच बंद असल्याने सदरचा कार्यक्रम कधी राबवणार व श्वान संख्या नियंत्रणात कधी येणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.