ठाणे

Ambarnatha Bribe | अंबरनाथ महसूल खात्याचा काळा कारभार उघड, द्वारली-ढोकली सजाचे ग्राम महसूल अधिकारी ठाणे एसीबीच्या जाळ्यात

शेतकऱ्यांच्या हक्काच्या कामासाठीही ‘दर’ ठरले

पुढारी वृत्तसेवा

नेवाळी : अंबरनाथ तालुक्यातील द्वारली-ढोकली सजाचे ग्राम महसूल अधिकारी ईश्वर जाधव याला २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या  ठाणे पथकाने शुक्रवारी रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागातील भ्रष्टाचाराची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. नागरिकांच्या हक्काच्या कामांसाठीही पैसे मोजावे लागत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.

तक्रारदाराच्या वडिलांच्या निधनानंतर वारस म्हणून सावत्र बहिणीचे नाव सातबारा उताऱ्यावर नोंद करून फेरफार काढण्यासाठी आरोपी अधिकाऱ्याने स्वतःसाठी १० हजार रुपये आणि मंडळ अधिकाऱ्यासाठी १० हजार रुपये अशी एकूण २० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार ठाणे एसीबीकडे करण्यात आली होती. विशेष म्हणजे, सामान्य नागरिकांचे कायदेशीर काम करण्यासाठीच पैशांची मागणी करण्यात येत असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. 

एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रचलेल्या सापळ्यात द्वारली येथील तलाठी कार्यालयात तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना जाधव यांना दुपारी रंगेहात पकडण्यात आले आहे. आरोपीकडून संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली असून मोबाईल फोनही तपासासाठी ताब्यात घेण्यात आला आहे. त्यांच्या राहत्या घराची झडतीही घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महसूल विभागातील भ्रष्टाचाराच्या तक्रारी सातत्याने समोर येत असताना वरिष्ठ अधिकारी नेमके काय करत आहेत, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. सातबारा, फेरफार, वारस नोंद यांसारख्या मूलभूत सेवांसाठीही नागरिकांना लाचेची मागणी सहन करावी लागत असेल, तर प्रशासनाची भ्रष्टाचारविरोधी यंत्रणा केवळ कागदावरच असल्याची टीका होत आहे. एसीबीच्या कारवायांमुळे अधूनमधून भ्रष्ट अधिकारी जाळ्यात अडकत असले तरी भ्रष्टाचाराची साखळी तोडण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे.

गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ तालुक्यात सातबारा फेरफार नोंदणीची कामे प्रलंबित असून तलाठी मंडळ अधिकारी टाळाटाळ करत असल्याचे दिसून आला आहे. उन्हाच्या तडाख्यामध्ये सर्वसामान्य नागरिक महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारत आहेत मात्र अधिकारी कामच करत नसल्याने नागरिकांकडून प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास एसीबीकडून केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT