भिवंडीत पाणी सत्याग्रह झालेली विहीर बुजवली pudhari photo
ठाणे

Mahaparinirvan Din 2025 : भिवंडीत पाणी सत्याग्रह झालेली विहीर बुजवली

Dr. Babasaheb Ambedkar : डॉ. बाबासाहेबांच्या पाऊलखुणा पुसण्याचा प्रयत्न?

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी : सुमित घरत

महामानव डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला खळबळजनक वृत्त समोर आले आहे. विशेष म्हणजे 6 डिसेंबर हा दिवस देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करून डॉ. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला जात असतानाच, त्यांच्याच पदस्पर्शाने पावन झालेल्या या विहिरीवर पाणी सत्याग्रह झाला होता. मात्र आता हीच ऐतिहासिक पाणी सत्याग्रहाची साक्ष देणारी 100 वर्षे जुनी सतीची विहीर बुजवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. ही सतीची विहीर भिवंडी तालुक्यातील पडघा ग्रामपंचायत हद्दीत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या घटनेवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

भिवंडी तालुक्यामधील पडघा ग्रामपंचायत हद्दीतील सतीची विहीर जवळपास 100 वर्ष जुनी असून त्याच सतीच्या विहिरीवरती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाणी सत्याग्रह केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पडघे, समतानगर येथे काशिनाथ हाशाबा दोंदे यांच्या घरी त्यावेळी आले होते. याच काळात सतीची विहीर निवडून येथे सत्याग्रहींसह पाणी काढण्यात आले होते. या घटनेचा उल्लेख ‌‘ठाणे संघसरिता‌’ या पुस्तकात स्पष्टपणे करण्यात आला आहे. आम्ही लहान होतो, तेव्हा डॉ.बाबासाहेब पडघ्यात आले होते. सतीच्या विहिरीवर त्यांनी पाणी सत्याग्रह केला.

एका शिसवीच्या झाडाखाली त्यांची मोठी सभा झाली होती. ‌‘मुलांना शिक्षण द्या‌’ असा संदेश त्यांनी आम्हाला दिला होता. समतानगर मधील काशिनाथ दोंदे यांच्या घरी उतरले होते. चहा पाणी घेतले होते, अशी आठवण समतानगर येथील हिराबाई सोनावणे (95) या आजींनी सांगितली. ही ऐतिहासिक विहीर पुन्हा उघडली जाणार का? या प्रश्नांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या संदर्भात पडघा मंडळ अधिकारी संतोष आगविले यांच्याशी संपर्क साधला असता या सतीच्या विहिरीबद्दल यापूर्वीही 2019 मध्ये चौकशी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर केला होता. दोन दिवसांपूर्वीच पुन्हा माझ्याकडे तक्रार अर्ज आला असून त्या अर्जावर येथे मंगळवारी सुनावणी घऊन चौकशी करून विहिरीबाबत निर्णय दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पाऊलखुणा पुसू देणार नाही...

बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली सतीची विहीर वाचवण्यासाठी गेल्या 20 वर्षांपासून लढा देत आहे. या संदर्भात पडघा भागत राहणारे कवी मिलिंद जाधव यांनी मुंबई, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, ठाणे जिल्हाधिकारी, भिवंडी प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन विहीर बुजविणाऱ्यावर तातडीने कारवाईची मागणी केली आहे. तसेच डॉ. बाबासाहेबांनी पदस्पर्श केलेली ही विहीर आमच्या पडघ्याचा अभिमान आहे. “डॉ. बाबासाहेबांच्या पाऊलखुणा पुसू देणार नाही” इतिहास पुसण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही सहन करणार नाही. विहीर पुन्हा उघडी करण्यासाठी माझा लढा कायम राहील, असे मिलिंद जाधव यांनी बोलतांना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT