ठाणे

डोंबिवली एमआयडीसी दुर्घटनेवरुन अंबादास दानवेंची राज्य सरकारवर आगपाखड

अविनाश सुतार

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान कंपनीत झालेल्या शक्तिशाली स्फोटाने अनेक निष्पापांचा बळी घेतला. या दुर्घटनेत जीवितहानीसह वित्तहानी होऊन आर्थिक नुकसान झाल्याने अनेक कुटुंबे उध्वस्त झाली आहे. त्यामुळे शासनाने आता डोंबिवली एमआयडीसीतील अतिधोकादायक कंपन्या बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर आगपाखड केली.

कंपनीत झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी डोंबिवली एमआयडीसीतील उद्योजकांच्या कामा अर्थात कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या पधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला कल्याण लोकसभा मतदार संघातील ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर-राणे या देखील उपस्थित होत्या. अंबादास दानवे यांनी दुर्घटनेत जखमी झालेल्यांची एम्स हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेऊन त्यांची जखमींची विचारपूस केली.

निरपराधांचे बळी घेणाऱ्या दुर्घटनेवर अंबादास दानवे यांनी हळहळ व्यक्त केली. राज्य सरकारला तिखट शब्दांत टोला लगावताना ते म्हणाले, डोंबिवली एमआयडीसीमध्ये घडलेली घटना दुर्दैवी असून सरकारला याचा जाब विचारला जाईल. उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात डोंबिवली एमआयडीसीतील 5 धोकादायक कंपन्या स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आताच्या सरकारच्या काळात त्यावर काहीच निर्णय झाला नाही. या कंपनीवर गुन्हा दाखल झाला पाहिजेल. तसेच सर्व विभागांची चौकशी व्हावी, अशीही मागणी अंबादास दानवे यांनी यावेळी बोलताना केली.

कायदा सर्वांसाठी समान

गुरूवारी डोंबिवलीतील महाभयंकर स्फोटानंतर प्रशासकीय यंत्रणा जागृत झाल्या आहेत. कंपनी मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा एका रात्रीत दाखल झाला. परंतु या कंपन्यांना सतत पाठबळ देणाऱ्या कामा संघटनेचे पदाधिकारी, एमआयडीसी आणि एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांवरसुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. नाहीतर या धोकादायक कंपन्या कधीच स्थलांतरीत होणार नाही. त्यामुळे कंपनी मालकांप्रमाणे अधिकाऱ्यांना दोषी ठरवून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, याकडे मनसेचे नेते तथा आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सर्वश्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, एमआयडीसीचे ट्विट द्वारे लक्ष वेधले आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT