ठाणे

ऑल इज वेल! मुंबईच्या वेशीवर गरोदर महिलेने हातगाडीवरून गाठले रुग्णालय !

पुढारी वृत्तसेवा
पनवेल : विक्रम बाबर

मुंबईच्या वेशीवर विकासाला गवसणी घालणाऱ्या पनवेल शहरात सोमवारी (दि.9) पहाटे प्रगत शहराच्या कल्पनेला धक्के देणारा प्रकार समोर आला. पनवेल शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आसूड गावातील एका गरोदर महिलेला चक्क हातगाडीवरून रुग्णालयात नेण्याची वेळ तिच्या कुटुंबावर आली. मध्यरात्रीची वेळ, ना रिक्षा ना टॅक्सी, प्रशासनही मदतीला धावून आले नाही, १०८ रुग्णवाहिकेचा नंबर लावला, पण प्रतिसाद मिळाला नाही... शेवटी प्रसूती वेदना झेलत ही महिला हातगाडीवरून रुग्णालयात पोहोचली आणि सुखरुप बाळंतही झाली.

ही २५ वर्षीय महिला कुटुंबासह आसूडगावच्या मोकळ्या मैदानातील झोपड्यात राहते. दिवसा डोंबाऱ्याचा खेळ करून तिचा उदरनिर्वाह चालतो. दोरीवरच्या कसरती लीलया करणाऱ्या या महिलेवर हातगाडीवरची जीवघेणी कसरत करण्याची वेळ ओढवली. मंगळवारी मध्यरात्री तिला प्रसूतीच्या वेदना जाणवू लागल्या, मात्र रुग्णालयात जाण्यासाठी कोणतेही वाहन मिळत नव्हते. कुटुंबाने आशा वर्कर्सना फोन करून माहिती दिली. आशा वर्करने फक्त ॲम्बुलन्सचा नंबर दिला, तो लावला तरी कुणी उचलत नव्हते. हतबल कुटुंबाने चक्क जुगाड करत कुटुंबाकडे असलेल्या मोटारसायकलला हातगाडी जोडली आणि त्या हातगाडीवर गरोदर महिलेस बसवून तब्बल ३ किमी अंतर कापले आणि नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय गाठले. तेथील डॉक्टरांच्या टीमने तत्काळ उपचार सुरू केले. मंगळवारी (दि.10) पहाटे या महिलेने गोंडस मुलाला जन्म दिला.

१०८ ची कबुली

पनवेल तालुक्यात आमच्या तीन ॲम्बुलन्स आहेत. एक ॲम्बुलन्स राखीव असते. ओसाडवाडीचा फोन आला तेव्हा एक ॲम्बुलन्स मुंबईच्या एका रुग्णालयात रुग्णाला घेऊन गेली होती, तर अन्य ॲम्बुलन्स नेहमीच्या कार्यक्रम सेवेच्या स्थळी होत्या, त्या आम्ही मागवू शकत नव्हतो, अशी कबुली जिल्हा व्यवस्थापक जीवन काटकर यांनी दिली.

आयुष्याची गाडी

पोटाची खळगी भरण्यासाठी जी हातगाडी आमच्या संसाराचा रहाटगाडा हाकत होती तीच गाडी माझ्या पत्नीच्या प्रसूतीसाठी मदतीला धावून आली, १०८ च्या रुग्णवाहिकेला फोन केला, फोन उचलला, अर्धा तास बोलणे झाले, मात्र ॲम्ब्युलन्स आलीच नाही, असे या महिलेचा पती भगत गौड याने सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT