ठाणे : दिवाळीच्या प्रकाशोत्सवानंतर आठवडा उलटून गेला असला तरी, शहराच्या वातावरणात अजूनही फटाक्यांच्या धुराचे अवशेष आणि प्रदूषणाची तीव्रता जाणवते आहे. गेल्या काही वर्षांत शासन, पर्यावरण विभाग आणि विविध सामाजिक संस्थांनी प्रदूषण नियंत्रणासाठी अनेक उपक्रम राबवले असले तरीही दिवाळी आली की “फटाके फोडल्याशिवाय सण अपूर्ण” हीच मानसिकता कायम दिसून येते आहे.
प्रदूषण कमी करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून अनेक पावले उचलली जात आहेत, ज्यात वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम, इंधनाची गुणवत्ता सुधारणे आणि सार्वजनिक वाहतूक प्रोत्साहन देणे यांसारख्या सरकारी उपायांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, राज्य शासनाकडून तसेच विविध सामाजिक संस्थांकडून प्रदूषण नियंत्रणासाठी आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी विविध उपाय तसेच जनजागृती राबविण्यात येत आहे. मात्र असे असले तरी दिवाळीत फटाके फोडण्याचे प्रमाण गेल्या पाच ते सहा वर्षात दुपटीने वाढल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
या विरोधाभासामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता यंदाही धोकादायक पातळीवर गेली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहराचा 202 नोंदवला गेला, तर वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात तो तब्बल 373 इतका पोहोचला. “अतिवाईट” श्रेणीत मोडणाऱ्या या पातळीमुळे श्वसनविकार असलेल्या रुग्णांना मोठा त्रास झाला.
शासनाने रात्री 10 वाजेपर्यंतच फटाके फोडण्याची परवानगी दिली होती; मात्र अनेक भागांत पहाटे 2 वाजेपर्यंत आतषबाजी सुरूच राहिली. त्यामुळे प्रदूषणाचा शिखरबिंदू ओलांडला गेला. “कायद्याच्या अंमलबजावणीपेक्षा नागरिकांचा जबाबदारीचा अभाव अधिक धोकादायक आहे,” असे पर्यावरणतज्ज्ञांचे मत आहे.
शासनाच्या मोहिमांना प्रतिसाद अपुरा
राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, पालिका आणि पोलिस प्रशासन दरवर्षी नागरिकांना फटाक्यांपासून दूर राहण्याचे आवाहन करतात. शाळांमधून जनजागृती मोहीम राबवली जाते, परंतु प्रत्यक्षात जनतेचा सहभाग मर्यादित राहतो. “शासनाचे आदेश आणि सामाजिक आवाहनं एकीकडे, पण सणाच्या उत्साहात शहाणपणाचा विसर पडतो,” असे एका पर्यावरण कार्यकर्त्याने सांगितले.
फटाक्यांचा फटका थेट आरोग्यावर
श्वसनरोगतज्ज्ञ डॉ. जलील पारकर यांनी सांगितले, “फटाक्यांमधून बाहेर पडणारे सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड व सूक्ष्म धूलिकण फुप्फुसांवर तीव्र ताण आणतात. दम्याचे झटके, ॲलर्जिक ब्राँनकायटिस आणि प्रदूषणजन्य श्वसनदाहाचे प्रमाण दिवाळीनंतर वाढले आहे.” गरोदर महिला, लहान मुले व वृद्ध व्यक्ती या प्रदूषणाच्या थेट माऱ्यावर आहेत.