प्राथमिक शाळेपासून सुरू होणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अभ्यास pudhari photo
ठाणे

AI in primary education : प्राथमिक शाळेपासून सुरू होणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अभ्यास

कोकणात पन्नास शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर अभ्यासक्रम सुरू होणार

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ए-आय चे मायाजाल आता सर्व जगात सुरू झाले असताना प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्येही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अभ्यास सुरू करण्याचा निर्णय ग्रामीण भागातील शिक्षण सस्थांनी घेतला आहे. शाळांमध्ये सुरू असलेल्या कार्यानुभव या विषयांतर्गत ए आय चा अभ्यास शिकविला जाणार आहे. यापूर्वी आयबीटी मूलभूत ज्ञान तंत्रज्ञानाची ओळख या विषयाला राज्य सरकारला मान्यता दिली होती. यामध्ये कृषी, इलेक्ट्रीकल, गृहविज्ञान आणि तंत्रविज्ञान असे विषय शिकवले जात होते. या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा या विषयाचा समावेश करण्यात आला आहे.

कोकणात ज्ञानप्रबोधिनीकडून शंकर महादेव विद्यालय कुंभवडे यांसह रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगडमधील 50 शाळांमध्ये हा प्रयोग राबविला जात आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा सध्याच्या परिस्थितीत जगात सर्वत्र खूप दबदबा व गाजावाजा आहे. असे सुस्पष्ट चित्र असतांना या कृत्रिम बुद्धिमत्तेचा समाजातील विविध क्षेत्रांत, विविध घटाकांवर, तरुण पिढी, विद्यार्थी वर्गावर व समाज यंत्रणेवर होणारे परिणाम शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासक मंडळीने अभ्यासणे व त्याचे परीक्षण करणे गरजेचे वाटते.

कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत एकूणच माहिती, त्याचे परिणाम व उत्पादकक्षम कृत्रिम बुद्धिमत्तेसारखे अवगत तंत्रज्ञान हे सर्वांच्याच उत्सुकतेचा विषय ठरले आहे. विशेषत: ग्रामीण भागातील शाळांमध्येही आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शिरकाव झाला असून शाळेत शिकवल्या जाणार्‍या अनेक शाखा आणि विषयांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जोड मिळाल्याने शिक्षण क्षेत्राला एक वेगळा आयाम मिळणार आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला मराठीत कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात. कृत्रिम बुद्धिमत्ता ही संगणक विज्ञानाची एक शाखा असून त्याचे एक अवगत क्षेत्र आहे. ज्याद्वारे आपण मनुष्याप्रमाणे विचार करणारी, निर्णय घेणारी व मनुष्याप्रमाणे वागणारी अशी सक्षम मशीन तयार करू शकतो. कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे एखाद्या मशीनमध्ये आपण मनुष्यावर आधारित कौशल्ये इनबिल्ड करू शकतो. कृत्रिम बुद्धिमत्तेत बुद्धिमान संगणक प्रणालींचा म्हणजेच प्रोग्रामिंग कोडिंगचा वापर करून एखादी गोष्ट निर्माण करण्यास, ती करून घेण्यास, त्याचे विश्लेषण करण्यास व त्यानुसार प्रतिक्रिया देण्यास सक्षम अशी संगणकाची आज्ञावली तयार करण्यात येते.

शिक्षण क्षेत्राला आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जोड मिळाल्याने शिक्षण क्षेत्राची व्याप्तीच बदलण्याची ताकद या तंत्रज्ञानात आहे. एआय-संचालित प्रणाली विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचे मूल्यांकनही करू शकते. आवश्यकतेनुसार शिक्षण व एकूणच शिक्षण क्षेत्रात काय बदल करता येतील याच्या कल्पना या तंत्रज्ञाच्या माध्यमातून स्पष्ट होणार आहे. संशोधनानुसार, जवळपास 70 टक्के शिक्षकांना व शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांना कृत्रिम बुद्धिमत्ता हा शैक्षणिक अभ्यासक्रमाचा एक भाग असावा असे वाटते. शैक्षणिक वातावरणात तंत्रज्ञानाचा व्यापक समावेश झाल्याने आपण ज्या पद्धतीने शिकवतो त्यामध्ये मोठे बदल होत आहेत.

विविध शिक्षण गट, प्रशिक्षक व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अनुभव वैयक्तिकृत करू शकणार्‍या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनां -पैकी एक म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. सामान्य विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहेच मात्र शारीरिकदृष्ट्या जे विद्यार्थी सक्षम नाहीत उदाहरणार्थ बहिरे, अंध किंवा ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर व्याधी असलेल्या विद्यार्थ्यांना या प्रणालीच्या माध्यमातून शिक्षणाच्या क्षेत्रात सहभागी करून घेता येणे शक्य झाले आहे. ज्या विशेष मुलांच्या गरजा पूर्ण कराव्या लागतात त्यांच्या शिकण्याच्या अनुभवांना वाढविण्यासाठी एआयचा वापर केला जाऊ शकतो.

शिक्षण व्यवस्थादेखील सक्षम होणार

केवळ शहरांमधील शाळांमध्येच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात येत नसून आता ग्रामीण भागातील शाळांमध्येही या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला असून विविध विषयांमध्ये व विविध शाखांत या प्रणालीचा वापर करण्यात येत असून यामुळे ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था देखील सक्षम होणार हे निश्चित मानले जात आहे.

  • वर्गात, एआय ट्यूटर्सच्या मदतीने शिक्षक बराच वेळ वाचवू शकतात. कारण त्यांना कठीण विषयांवर जास्त वेळ घालवावा लागणार नाही. आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या माध्यमातून चालवले जाणारे चॅटबॉट्स किंवा एआयद्वारे चालवले जाणारे व्हर्च्युअल पर्सनल असिस्टंट मुलांचा वेळ वाचवतात. त्यांना आता अतिरिक्त मदतीसाठी त्यांच्या शिक्षकांकडे किंवा पालकांकडे जावे लागत नाही. ते इतर शैक्षणिक कारणांसाठी तो वेळ वापरू शकतात.

  • एआयच्या मदतीने, तुम्ही विविध प्रकारचे शिक्षण संसाधने एक्स्प्लोर करता येऊ शकतात, ज्यामध्ये डिजिटल पाठ्यपुस्तके, अभ्यास सहाय्य आणि अभ्यासक्रमांचे तपशील यांचा समावेश आहे.

  • आजच्या परिस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्तेची बरीच साधने ही विविध उद्योगांमध्ये, उत्पादन क्षेत्रांमध्ये, आरोग्यसेवेत, प्रवास क्षेत्र, बँकिंग क्षेत्र, संशोधन, शिक्षण, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, इव्हेन्ट मॅनॅजमेण्ट आणि वित्त ते विपणन अशा अनेक क्षेत्रांमध्ये पद्धती निर्माण करण्यापासून ते संपूर्ण कार्ये स्वयंचलित करण्यापर्यंत तसेच त्यावर देखरेख ठेवण्याकरिता, संपूर्ण डेटाचे विश्लेषण करण्यासाठी आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारण्यासाठी वापरली जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT