संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. pudhari news network
ठाणे

Agitation in Thane | ठाण्यात सोमवार ठरला आंदोलनाचा वार

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : आठवड्याचा पहिला दिवस सोमवार हा ठाण्यात आंदोलनाचा ठरला आहे. वर्तकनगर येथील रहिवाशांना 48 तासांत घरे खाली करायला सांगितल्याने या परिसरातील 60 ते 70 कुटुंबीय प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते. दुसरीकडे अनुसूचित जमाती प्रवर्गात धनगरांचा समावेश करू नये यासाठी बांधवांच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. तर मुंब्रा येथील कचरा उचलला जात नसल्याने तसेच पाणी वितरणामध्ये मुंब्रा सोबत दुजाभाव होत असल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाकडूनही मुंब्रा परिसरात बेमुदत आंदोलन पुरकरण्यात आले. (The first day of the week, Monday, has been marked as a day of agitation in Thane)

एकूणच आठवड्याचा पहिल्या सोमवारी (दि.30) रोजी ठाणे शहरात विविध आंदोलनांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधल्याचे चित्र पहायला मिळाले.

राज्य सरकारने धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात म्हणजेच अनुसूचित जमाती अंतर्गत आरक्षण देण्यासाठी समिती गठीत केली आहे. त्या निषेधार्थ तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गात धनगरांचा समावेश करू नये, या मागणीसाठी सोमवारी संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळेस, धनगर समाजाला आदिवासी जमातींमध्ये समाविष्ट करून बेरजेचे राजकारण कराल तर आम्ही 85 मतदारसंघात वजाबाकीचे राजकारण करू, असा इशारा संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचे निमंत्रक अनिल भांगले, सुनील झडके आणि हंसराज खेवरा यांनी दिला. 15 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी समितीचे गठन केले आहे. या संदर्भात स्वतंत्र जी. आर. काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याविरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता.

मुंब्रा तसेच कौसा परिसरात शहरात साचलेल्या कचर्‍याची समस्या व पाणीप्रश्नी नागरिक आक्रमक झाले.

सोमवारी (दि.30) रोजी भगवती शाळेपासून या मोर्चाला सुरूवात झाली. या मोर्चात शेकडो आदिवासी सहभागी झाले होते. गोखले रोड, राम मारुती रोड मार्गे, पु.ना. गाडगीळ ज्वेलर्स चौकातून तलावपाळी रोड, राजवंत ज्वेलर्स पासून डावीकडे गडकरी रंगायतन चौकातून उजवे वळण घेऊन चिंतामणी चौक, जांभळी नाका येथून अग्यारी रोड मार्गे टेंभी नाका येथून उजवीकडे कोर्ट नाका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुढे राघोजी भांगरे चौक, कोर्ट नाका शासकीय विश्रामगृह येथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळेस मंचावर अनिल भांगले, हंसराज खेवरा , सुनील झडके, दीपक पेंदाम, रमेश परचाके, रमेश आत्राम, मधुकर तळपाडे, समीर तडवी आदी उपस्थित होते.

वर्तकनगर येथील रहिवाशांना घरे खाली करण्याच्या दिलेल्या नोटिसांविरोधात कुटुंबीय रस्त्यावर उतरले होते.

दरम्यान वर्तकनगर म्हाडाच्या घरांमध्ये राहणार्‍या रहिवाशांना ठाणे महापालिकेने 48 तासांत घरे खाली करण्याच्या नोटिसा दिल्याने सोमवारी या परिसरातील रहिवासी ठाणे महापालिकेच्या विरोधात रस्त्यावर उतरले. पुनर्वसनाबाबत रहिवाशांची कोणत्याही प्रकारची बैठक न घेता घरे खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्याने रहिवाशी संतप्त झाले आहेत.

वर्तकनगर म्हाडा येथील इमारत क्रमांक 54,55,56 च्या जागेवर पीपीपी तत्वावर पुनर्वसन प्रकल्प राबवण्यात येणार आहे. यामध्ये 40 ते 50 कुटुंबे आणि 80 च्या वर गाळेधारक बाधित होणार आहेत. मात्र विकासकाकडून किंवा महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची माहिती किंवा बैठक घेण्यात आली नसून महापालिकेने सरळ 48 तासांत घरे खाली करण्याच्या नोटिसा दिल्याने नागरिक संतप्त झाले. मनसेचे पदाधिकारी संदीप पाचंगे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी ठाणे महापालिकेच्या विरोधात रस्त्यावर उतरून त्यांनी पालिकेच्या विरोधात निदर्शने केली.

पाणी ,कचर्‍यासंदर्भात नागरिक आक्रमक

मुंब्रा तसेच कौसा परिसरात कचरा उचलला जात नाही तसेच पाणी पुरवठा वितरणामध्ये मुंब्रा आणि कौसाबाबत ठाणे महापालिकेकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने केला आहे.

महापालिकेच्या या भूमिकेविरोधात ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी सोमवार पासून बेमुदत आंदोलन पुकारले आहे.ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा कार्यालयाच्या बाहेर हे बेमुदत आंदोलन पुकारण्यात आले आहे. मुंब्रा आणि कौसा भागात पाणी कमी आणि कचरा जास्त अशी परिस्थिती असल्याचा आरोप पठाण यांनी केला आहे.कचरा व दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून अखेर याप्रश्नी नागरिकांनी यावेळी ठाणे महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT