भिवंडी : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील बाधित शेतकरी कचरु कृष्णा पाटील यांची मौजे भरोडी येथील ते कसत असलेली वडिलोपार्जित जमीन मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी संपादित झाली असून कचरू पाटील यांना त्यांनी प्रांत कार्यालयात वारंवार हेलपाटे मारूनही जमीन भूसंपादनाचा मोबदला न मिळाल्याने अखेर त्यांनी मोबदल्यासाठी मंत्रालयात जाऊन दाद मागणार असून मोबदला न मिळाल्यास मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा माध्यमांशी बोलताना दिला आहे.
त्यानुषंगाने कचरू पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की,10 नोव्हेंबर 2023 रोजी संबंधित अधिकाऱ्यांनी माझ्याकडून बायोमेट्रिक रजिस्टर करून घेतल्यानंतर मी त्यासाठी वर्षभर प्रांत कार्यालयात हेलपाटे मारले. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी पैसे देता येत नसल्याचे त्यावेळी सांगितले. त्यानंतर कचरू पाटील यांनी त्यांची महत्वाची कागदपत्रे मिळण्यासाठी प्रांत कार्यालयात एका अर्जाद्वारे मागणी केली असून आजतागायत कागदपत्रे मिळाली नसून माहितीच्या अधिकाराद्वारे माहिती मागितली असता त्याचेही उत्तर मिळत नसल्याचे सांगितले आहे.
सदर बुलेट ट्रेन प्रकल्प बाधित जमीन ही कचरू पाटील यांची 100 वर्षापासूनची वडिलोपार्जित जमीन असून तहसीलदारांच्या ऑर्डर नुसार बायोमेट्रिक रजिस्टर करताना संबंधित अधिकारी धूर्त राष्ट्र होते का ? असा गंभीर प्रश्न कचरू पाटील यांनी उपस्थित केला आहे. संबंधित अधिकारी मोबदल्याचे पैसे देण्यास टाळत असल्याचा आरोप कचरू पाटील यांनी केला असून जमिनीचा मोबदला न मिळाल्यास मंत्रालयासमोर जाऊन आत्मदहन करणार असल्याची प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली आहे.