डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या डोंबिवली जवळील 27 गावांपैकी असलेल्या सोनारपाडा गावात रविवारी सकाळी दोन बैलांमध्ये निकराची झुंज लावणे बैलांच्या मालकांना चांगलेच महागात पडले आहे. बंदी असतानाही प्राणी अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा भंग केल्याप्रकरणी पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशांवरून मानपाडा पोलिसांनी तीन बैल मालकांच्या विरोधात गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली आहे.
रोशन दळवी, गणेश साळवी आणि बारक्या मढवी अशी बैल मालकांची नावे असून यातील दोघे अंबरनाथ तालुक्यातील काकडवाल, तर एक जण कल्याण पश्चिमेतील सापर्डे गावात राहणारा आहे.
सोनारपाड्यातील क्रिकेट मैदानावर रोशन दळवी, गणेश साळवी आणि बारक्या मढवी यांनी रविवारी सकाळी खिल्लारी बैल झुंजीसाठी उतरवले होते. झुंजी पाहण्यासाठी अगदी दूरवरून देखिल आलेल्या बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. या झुंजीमध्ये जिंकणारा बैल आणि त्याच्या मालकाचा मोठा मान मिळतो. आपला बैल झुंजीमध्ये जिंकावा यासाठी अस्तित्वाच्या लढाईप्रमाणे तिन्ही मालक आणि त्यांच्या साथीदारांनी खिल्लारी बैलांच्या झुंजी लावल्या होत्या.
एकीकडे उन्मत्त झालेल्या बैलांनी आपली ताकद पणाला लावून एकमेकांना मागे रेटण्याचे, शिंगे एकमेकांच्या शरीरात खुपसण्यासह झुंजीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. तर दुसरीकडे आपला बैल जिंकावा म्हणून तिन्ही मालक देखिल आक्रमक झाले होते. या झुंजी बघ्यांतील अनेकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडियो करून समाज माध्यमांवर प्रसारित केल्या. हा अघोरी आणि मुक्या जनावरांना क्रूरपणे छळण्याचा प्रकार समजल्यानंतर उपायुक्त अतुल झेंडे यांनी स्थानिक पोलिसांना फौजदारी कारवाईचे अस्त्र बाहेर काढण्याचे फर्मान सोडले. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली प्राणी अत्याचार प्रतिबंधक कायद्याने बैलांच्या मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आला.
प्लॅन्ट फाॅर ॲनिमल वेल्फेअर सोसायटी अर्थात पाॅज संस्थेचे संस्थापक डॉ. निलेश भणगे यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना सांगितले की, बैलांच्या झुंजी भारतात कायदेशीर नाहीत. या झुंजीवर शासनासह न्यायालयांनीही वेळोवेळी बंदी आदेश काढले आहेत. याला जल्लीकट्टू देखील म्हणतात. अशा झुंजी म्हणजे प्राण्यांच्या हक्काचे उल्लंघन आहे. अशा झुंजी कुणी लावत असतील तर नागरिकांनी स्वत:हून पुढाकार घेऊन स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल कराव्यात. आपणास या प्रकारांबद्दल माहिती दिल्यास ती माहिती योग्य ठिकाणी कायदेशीर कारवाईसाठी आपण पोहचवू शकतो. कल्याण, अंबरनाथ, आदी तालुक्यांतील ग्रामीण भागात बैलगाडा शर्यती, बैलांच्या झुंजी खेळवल्या जात आहेत.
सोनारपाड्यात रविवारी बैलांमध्ये झुंजी लावून प्राणी हक्क कायद्याचा उल्लंघन करणाऱ्या गणेश साळवी, रोशन दळवी आणि बारक्या मढवी यांच्या विरूध्द मानपाडा पोलिस ठाण्यात कलम 125 बीएनएससह प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 चे कलम 11 (1), (क), 11(1), (ड) सह महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम कलम 37 (3), 135 अन्वये मुक्या प्राण्यांना क्रूरतने वागविण्याच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या झुंजींमध्ये आणखी कुणी सामील आहे का ? याचाही चौकस तपास करण्यात येणार आहे. त्यात अजून कुणाचा समावेश असल्यास त्यांनाही या गुन्ह्यात सामील करून घेण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांनी सांगितले.