सापाड : कल्याण तहसीलदार कार्यालयाच्या पथकाकडून शुक्रवारी कल्याण रेतीबंदर ते डोंबिवली कुंभारखाण पाडा दरम्यान खाडीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अनधिकृत रेती उत्खननावर धडक कारवाई करण्यात आली.
तहसीलदार कार्यालयाच्या पथकाकडून बोटीच्या सहाय्याने गस्त घालत असताना खाडीपात्रात दोन मोठे बार्जेस, रेती वाहून नेणार्या नौका आणि चार संक्शन पंप वापरून अवैध रेती उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार केलेल्या कारवाईत पथकातील मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी यांना पाहून, रेती उत्खनन करणार्या इसमांनी खाडीपात्रात उड्या मारून विरुद्ध दिशेने पोहत तेथून तत्काळ पळ काढला.
कल्याण तहसीलदार कार्यालयाकडून कारवाई करताना बार्जेस आणि संक्शन पंप हे खाडीपात्रातून बाहेर काढणे शक्य नसल्याने, प्रशासनाने ठोस पावले उचलली. बार्जेसच्या इंजिनामध्ये साखर व रेती टाकून त्यांना नादुरुस्त करण्यात आले व त्यानंतर त्या बार्जेसना आग लावण्यात आली. याचवेळी, सक्शन पंपांनाही गॅस कटरने छिद्र पाडून खाडीपात्रातच बुडवण्यात आले.
या कारवाईत नष्ट करण्यात आलेल्या दोन बार्ज अंदाजे रुपये 14 लाख आणि चार सक्शन पंप 16 लाख अशी साधनसामुग्री अंदाजे 30 लाख रुपये किमतीची होती. या कारवाईमुळे अनधिकृत रेती उत्खनन करणार्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.