ठाणे

Dombivli News : डोंबिवलीत मनमानी भाडेवाढ करणाऱ्या १८ रिक्षाचालकांना दणका; ४७ हजारांचा दंड वसूल

कल्याण आरटीओची धडक कारवाई; ५० हून अधिक रिक्षांची तपासणी, प्रवाशांकडून जबरदस्तीने पाच रुपये अतिरिक्त भाडे वसुली

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेकडील महात्मा फुले रस्त्यावरील काही रिक्षाचालकांकडून प्रवाशांची मनमानी पद्धतीने लूट सुरू असल्याचे समोर आले आहे. शासनाची किंवा परिवहन विभागाची कोणतीही अधिकृत मान्यता नसताना रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परस्पर पाच रुपयांची भाडेवाढ लागू केली. गेल्या दोन दिवसांपासून या मार्गावरील काही रिक्षाचालक प्रवाशांकडून जबरदस्तीने पाच रुपये अतिरिक्त भाडे वसूल करत होते. या प्रकाराची गंभीर दखल घेत कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाने मंगळवारी रात्री धडक कारवाई केली. या कारवाईत ५० हून अधिक रिक्षांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी नियमबाह्य पद्धतीने वाढीव भाडे आकारणाऱ्या १८ रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करून तब्बल ४७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

पश्चिम डोंबिवलीतील महात्मा फुले रस्त्यावरील रिक्षाचालकांकडून वाढीव भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांच्याकडे परिवहन विभागाच्या ऑनलाइन संकेतस्थळावर प्राप्त होत होत्या. काही रिक्षाचालक प्रवाशांकडून नियमित भाड्याव्यतिरिक्त पाच रुपये अधिक घेत असल्याचे तक्रारींमधून स्पष्ट झाले. या प्रकाराची दखल घेत आशुतोष बारकुल यांच्या आदेशानुसार मोटार वाहन निरीक्षक आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांच्या २० जणांच्या पथकाने मंगळवारी रात्री पश्चिम डोंबिवलीत धडक दिली.

रिक्षाचालकांना कारवाईचा सुगावा लागू नये, यासाठी पथकाने थेट महात्मा फुले रस्त्यावरील रिक्षा स्टँडवर जाण्याऐवजी रिक्षाचालकांच्या मार्गावरील शेवटच्या आणि मधल्या थांब्यांवर जाऊन प्रवाशांची चौकशी केली. रिक्षातून उतरलेल्या प्रवाशांना किती भाडे दिले, याची माहिती अधिकाऱ्यांनी घेतली. बहुतांश प्रवाशांनी २० रुपये भाडे दिल्याचे सांगितले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी संबंधित रिक्षाचालकांकडे या वाढीव भाड्याला कोणाची परवानगी आहे, अशी विचारणा केली. मात्र, अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना रिक्षाचालकांकडे समाधानकारक उत्तर नव्हते.

या मोहिमेत परिवहन विभागाच्या पथकाने एकूण ५० हून अधिक रिक्षांची तपासणी केली. त्यापैकी १८ रिक्षाचालकांकडून नियमबाह्य पद्धतीने वाढीव भाडे आकारले जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या सर्वांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. नवापाडा, गरीबाचापाडा, गणेशनगर आणि अनमोलनगरी येथील रिक्षा थांब्यांवर ही मोहीम राबविण्यात आली. आरटीओच्या या कारवाईमुळे मनमानी भाडेवसुलीला चाप बसण्याची अपेक्षा व्यक्त करत प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.

दरम्यान, शासनाने अधिकृतरीत्या रिक्षा भाडेवाढ केली तर ती देण्यास आमची हरकत नाही. मात्र, महात्मा फुले रस्त्यावरील काही ठरावीक रिक्षाचालकांनी परस्पर पाच रुपये वाढवून प्रवाशांकडून जबरदस्तीने वसूल करणे चुकीचे आहे, अशी भूमिका प्रवाशांनी मांडली.

कारवाईनंतरही मनमानी सुरूच

विशेष म्हणजे, मंगळवारी रात्री आरटीओच्या पथकाने कारवाई केल्यानंतरही बुधवारी सकाळी महात्मा फुले रस्त्यावरील काही रिक्षाचालकांकडून वाढीव भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या. गोपीनाथ चौक ते डोंबिवली रेल्वे स्थानक आणि डोंबिवली रेल्वे स्थानक ते गोपीनाथ चौक या मार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या एमएच ०५/सीजी/१४५० आणि एमएच ०५/ईएक्स/०६२९ या क्रमांकांच्या रिक्षाचालकांनी वाढीव भाडे आकारल्याच्या तक्रारी आरटीओच्या ऑनलाइन संकेतस्थळावर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कारवाईनंतरही काही रिक्षाचालकांची मनमानी सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून पाचारण

पश्चिम डोंबिवलीत रिक्षा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी परस्पर भाडेवाढीचा निर्णय घेतल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन विष्णूनगर पोलिसांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे. संबंधित भाडेवाढ करणाऱ्या रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी पोलिस ठाण्यात बोलाविण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.

दरम्यान, कोणत्याही रिक्षाचालकाने नियमबाह्य पद्धतीने प्रवाशांकडून वाढीव भाडे आकारू नये. अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित रिक्षाचालकांवर तातडीने कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी दिला आहे. तसेच, कोणी पाच रुपये अतिरिक्त भाडे आकारत असल्यास प्रवाशांनी परिवहन विभागाच्या ऑनलाइन संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT