डोंबिवली / सापाड : बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना ऑगस्ट महिन्यात घडली होती. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. आता अशाच प्रकारची एक घटना कल्याणमध्ये घडली आहे. एका 13 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. त्याआधी तिचे अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे.
23 डिसेंबरला संध्याकाळी कल्याण पूर्वेतून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. आईकडून 20 रुपये घेऊन अल्पवयीन मुलगी खाऊ आणण्यासाठी दुकानात गेली होती. मात्र ती परत न आल्याने कुटुंबाने मुलीचा शोध सुरू केला. बराच कालावधी उलटून ही मुलगी परत न आल्याने मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार कोळशेवाडी पोलिस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य दाखवत या प्रकरणाचा तपास सुरू केला. दुसर्या दिवशी म्हणजे 24 डिसेंबर रोजी मुलीचा मृतदेह कल्याण नजीक बापगाव परिसरात सापडला.
निरागस मुलीची हत्या झाल्याने कल्याणकरांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या संदर्भात उपायुक्त झेंडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणातील मारेकर्यांचा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 6 पथकांच्या साह्याने तपास सुरू केला आहे. या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिची हत्या करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालातून निष्पन्न झाले होते. पोलिसांनी अवघ्या काही तासात या प्रकरणातील दोन आरोपीची ओळख पटवली. त्याच परिसरात राहणारा विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. विशाल गवळीविरोधात याआधी देखील 4 विनयभंगाचे गुन्हे कोळसेवाडी पोलिस ठाण्यात दाखल आहेत. विशाल गवळी हा विकृत स्वभावाचा असल्याचे समोर आले आहे. त्याने आतापर्यंत तीन लग्न केली असून सध्या तो तिस—या बायकोबरोबर राहतो. पतीच्या दुष्कृत्यावर पडदा टाकत विशालच्या पत्नीने त्याला मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केल्याची धक्कादायक माहिती तपासातून उघड झाली.
अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपी विशाल गवळी याची पत्नी साक्षीने सांगितलं की, मुलीला सायंकाळी पाच वाजता घरात घेतले. त्यावेळी विशाल गवळीने मुलीसोबत गैरकृत्य करून हत्या केली. त्यानंतर एका मोठ्या बॅगमध्ये मुलीचा मृतदेह टाकून ठेवला होता. आरोपीची पत्नी बँकेत नोकरी करत असल्याने संध्याकाळी 7 वाजता घरी आली. त्यावेळी आरोपी पतीने पत्नीला घडलेला सर्व प्रकार सांगितला. हे ऐकून तिला धक्काच बसला. मात्र नंतर 7 वाजता दोघे पती-पत्नी एकत्र बसून मृतदेहाचे काय करायचे याबद्दल योजना आखली. त्याआधी घरातील रक्त दोघांनी पुसून टाकले. रात्री 8.30 वाजता मित्राची रिक्षा विशालने बोलावून घेतली. 9 वाजता बापगावच्या दिशेने रवाना झाले. तिथे मृतदेह फेकून दोघे घरी परतले. घरी परतत असताना विशालने आधारवाडी चौकातून दारू विकत घेतली आणि तेथून आपल्या पत्नीच्या गावी येथे निघून गेला. पत्नी साक्षी मात्र येथेच राहिली. मात्र घराजवळ सापडलेल्या रक्तामुळे विशालने हे कृत्य केल्याचा संशय आला.
मुलीची हत्या केनंतर विशाल कल्याण शहरातून पळून गेला. तो बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे पोहोचला. शेगाव परिसरात विशालची पत्नी साक्षी हिचे माहेर आहे. तेथे तिचे नातेवाईक राहतात. कल्याणच्या पोलिसांनी मुलीच्या हत्येप्रकरणी विशाल गवळीशी संबंधित सर्व नातेवाईकांना चौकशीसाठी मंगळवारी ताब्यात घेतले. सर्वांची कस्सून चौकशी केल्यावर विशाल बुलढाणा येथे गेल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांची पथके बुलढाणा येथे त्याचा शोध घेत होते. विशालला दाढी आहे. कुणाला ओळखू नये म्हणून त्याने बुधवारी सकाळी बुलढाण्यातील एका सलूनमध्ये दाढी केली. त्यानंतर पेहराव बदलून तो बाहेर पडत असताना पोलिसांनी त्याच्याच्या मानगुटीवर थाप टाकली.
कल्याणमधील घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरुन गेला गेला आहे.कल्याण पूर्वेच्या आमदार सुलभा गायकवाड यांनी देखील जे अक्षयसोबत झाले तेच विशालसोबत व्हावे, अशी मागणी केली आहे. तसेच या आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी देखील मागणी यावेळी त्यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे. या घटनेनंतर परिसरातील महिलांनी देखील संताप व्यक्त करत आरोपीला गोळ्या घालण्याची मागणी केलीये.
डोंबिवली : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी कल्याणात पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. घडलेली दुर्दैवी आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीला फाशी कशी होईल. त्यासाठी सरकारच्या बाजूने पूर्ण ताकदीने न्यायालयात प्रयत्न केले जातील. या प्रकरणाचा चौकस तपास सुरू आहे. अशा गुन्हेगाराला फाशीची शिक्षा कशी होईल, यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याला शंभर टक्के त्याला फाशी शिक्षा होईल, असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.