ठाणे : तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज, दिवंगत कीर्तनकार शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. अभिष्टचिंतन रविवार (दि.9) रोजी त्यांनी मोरे कुटूंबियांना 32 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
देहूमधील कीर्तनकार शिरीष महाराज मोरे यांनी गेल्याच आठवड्यात आर्थिक विवंचना असल्याने मंगळवारी (दि.5) जीवनयात्रा संपवली. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत आपल्यावर 32 लाखांचे कर्ज झाले असून ते फेडणे शक्य होत नसल्याने आपण टोकाचे पाऊल उचलत असल्याचे लिहिले होते. त्यांनी असा टोकाचा निर्णय घेऊन अकाली जीवनयात्रा संपवल्याने देहू नगरीत मोठी हळहळ व्यक्त करण्यात आली होती.
दिवंगत मोरे यांच्या जाण्याने त्यांच्या कुटूंबाला बसलेला धक्का पाहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोरे कुटूंबाला मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्याना 32 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला असून ही मदत घेऊन त्यांनी आमदार विजय शिवतारे यांना आजच शिरीष महाराज मोरे यांच्याघरी जाऊन ही मदत त्यांच्या कुटूंबियांना सुपूर्द करण्यास सांगितले आहे.
आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची आर्त विनवणी शिरीष महाराज मोरे यांनी आपल्या मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रातून सर्व मित्रमंडळींना केली होती. त्यांच्या याच विनवणीला साद देत संवेदनशील स्वभावाचे नेते अशी ओळख असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोरे कुटूंबाला आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी आपला मदतीचा हात पुढे केला आहे.