ठाणे : पुढारी वृत्तसेवा
बदलापूर अत्याचार केल्या प्रकरणी अटकेत असलेल्या अक्षय शिंदेला ठाणे पोलिसांनी सोमवारी एन्काउंटर मध्ये ठार केले आहे. अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला होता. या गोळीबारात एक पोलीस अधिकारी जखमी झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी आता मृत आरोपी विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षयचा एन्काऊंटर करणाऱ्या पोलीस टीमने याबाबत मुंब्रा पोलिसात फिर्याद दाखल केली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.
बदलापूर येथील शाळेत झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी ठाण्याजवळील मुंब्रा बायपासवर पोलीसांनी एन्काऊंटर केला. अक्षयने पोलिसांकडील रिव्हॉल्वर हिसकावून घेत पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. त्यात एपीआय निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागून ते जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणी आज (मंगळवार) पहाटे मृत अक्षय शिंदे विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात पोलिसांवर गोळीबार करून हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.