डोंबिवली : कल्याणमधील बांधकाम व्यावसायिक मंगेश गायकर आणि त्यांचा मुलगा गोळीबारात जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगेश गायकर यांच्या चिकणघर परिसरातील कार्यालयात गुरूवारी (दि.10) दुपारच्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीनुसार, मंगेश गायकर यांना स्वसंरक्षणासाठी दिलेली बंदूक साफ करत असताना चुकून गोळी सुटली. यात बिल्डर मंगेश गायकर आणि त्यांचा मुलगा असे दोघेही जखमी झाले आहेत. एकीकडे दोघा बाप-लेकांवर कल्याणातील मिरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे या गोळीबार प्रकरणाचा पोलिसांकडून चौकस तपास सुरू करण्यात आला आहे. तथापी गोळी अपघाताने उडाली वा अन्य कुणी गोळीबार केला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
मंगेशी ग्रुपचे मालक मंगेश गायकर यांचे कल्याण पश्चिमेकडे चिकणघर परिसरात कार्यालय आहे. गुरूवारी दुपारी तीनच्या सुमारास गायकर हे त्यांच्या सहकाऱ्यांसह व्यावसायिक भागीदारांसोबत एकत्र बसले होते. मंगेश गायकर यांच्याकडे स्वसंरक्षणासाठी परवानाधारी बंदूक आहे. ही बंदूक साफ करत असताना मंगेश गायकर यांच्या हातून गोळी सुटली. या गोळीने हाताच्या आरपार जाऊन त्यांच्या मुलाचाही वेध घेतला. गोळीबाराच्या आवाजाने कार्यालयात एकच पळापळ झाली. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. या गोळीबारात जखमी झालेल्या दोघा बाप-लेकाला तात्काळ मिरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केल्याने मंगेश गायकार आणि त्यांच्या मुलाची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
या घटनेची माहिती कळताच खडकपाडा आणि बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन सखोल तपास सुरू केला आहे. बिल्डर मंगेश गायकर यांना गोळी कशी लागली ? यावर संशोधन सुरू करण्यात आले आहे. हा प्रकार मिस फायरिंगमुळे झाल्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते. पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाचा तपास बड्या पोलिस अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.