नाशिकच्या धर्तीवर डोंबिवलीकरांसाठी बोटॅनिकल गार्डन उभारण्यात येणार आहे.  pudhari news network
ठाणे

Botanical Garden : नाशिकच्या धर्तीवर डोंबिवलीकरांसाठी उभारणार बोटॅनिकल गार्डन

शहरांच्या फुफ्फुसांना नवसंजीवनी देण्याचा अट्टाहास

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली (ठाणे): बजरंग वाळुंज

नाशिकच्या धर्तीवर डोंबिवलीकरांसाठी बोटॅनिकल गार्डन उभारण्यात येणार आहे. कल्याण विभागातील दावडी, भाल, उंबार्ली टेकडीवर होणाऱ्या बोटॅनिकल गार्डनसाठी राज्याचे पर्यटन विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यासंदर्भात केलेला पाठपुरावा अंतिम टप्प्यात आला असून सार्वजनिक बांधकाम विभागाने २९ मार्च २०२३ रोजी सादर केलेल्या आराखड्यास तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्यानंतर तत्काळ या गार्डनचे काम सुरू होईल.

मौजे धामटण येथील जंगल महाराष्ट्र वन विभागाच्या अखत्यारीतीत येते. या जंगलामध्ये विविध संस्थांतर्फे वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन सुरू असते. महत्त्वाचे म्हणजे हा परिसर डोंबिवलीचा ऑक्सीजन झोन म्हणून ओळखला जातो. विविध पक्षी, किटक, फुलपाखरे, साप, सरपटणारे प्राणी आणि वेगवेगळ्या वृक्षसंपदेने हा परिसर नटलेला आहे. दरवर्षी या जंगलाला समाजकंटकांकडून आगी लावण्याचे प्रकार सुरू असतात. विविध झाडे व पशू-पक्षी दरवर्षी आगीच्या भक्षस्थानी पडत आहेत. तर अनधिकृत बांधकामाच्या माध्यमातून या जंगलाचा बराचसा भाग गिळंकृत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे या जंगलाचा ऱ्हास होण्याच्या आधी त्याचे योग्य संवर्धन करणे आवश्यक आहे. मनसेची नाशिक महानगरपालिकेवर सत्ता असताना पांडवलेण्यांच्या पायथ्याशी असलेले पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यान टाटा ट्रस्टच्यावतीने विकसित करण्यात आल्याकडे राजू पाटील यांनी मंत्र्यांचे सातत्याने लक्ष वेधले आहे.

त्यामुळे नाशिक बोटॅनिकल गार्डनच्या धर्तीवर धामटण येथील वन विभागाच्या जंगलामध्ये बोटॅनिकल गार्डन बनविण्याचा मानस असून सदर गार्डन बनविण्यासाठी लागणारा निधी अनेक कंपन्या आपल्या सीएसआर निधीमधून उभारण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे पर्यावरण, वृक्ष, पक्षी, प्राणी यांचे संवर्धन करून जागतिक दर्जाचे धामटण येथे बोटॅनिकल गार्डन बनविण्याची सीएसआर फंडाकडून परवानगी द्यावी, अशीही मागणी राजू पाटील यांनी केली होती. यावर राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राजू पाटील यांच्या मागणीला प्रतिसाद दिला.

निसर्गप्रेमींना भुरळ घालणाऱ्या डोंबिवली माऊंटन पॉईंट सोनारपाडा, दावडी, भाल, उंबार्ली या चार गावांच्या मध्यभागी वसलेली ही टेकडी नेहमी खुणावत असते. या टेकडीवर डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व निसर्गप्रेमींनी जवळपास १५ हजार झाडे लावण्यात आली आहेत. नुसती लावली नाही तर जगवलीही आहेत. पावसाळी दिवसांत तर झाडे-झुडपांची वाढ झाली आहे. त्यामुळे पशु, पक्षी, बारीकसारीक जनावरे, वेगवेगळ्या जातीची फुलपाखरे, सरपटणारे प्राणी मोठ्या प्रमाणात आढळू लागले आहेत.

बेकायदा बांधकामांची बजबजपुरी, धूर ओकणारी वाहने आणि कारखाने, यामुळे वाढते ध्वनी व वायू प्रदूषणामुळे कल्याण-डोंबिवली शहरांची फुफ्फुसे निकामी होत चालली आहेत. या फुफ्फुसांना वाचविण्यासाठी शासन-प्रशासनाकडून नेहमीच प्रयत्न केले जात असतात.

निसर्गप्रेमीना टेकडीवर बघण्यासारखी ठिकाणे अशी...

  • कातळात असलेली पाण्याची टँक

  • वाघांची गुफा

  • शिवपिंड

  • मांडवघर

  • पाणी आडवा पाणी जिरवासाठी बांधलेली २ धरणे

  • पाच पांडवांच्या गुढघ्याचे निशाण

  • ब्रिटिशकालीन असलेली चिमणी

  • पक्षी ज्या ठिकाणी वावरतात त्या भागात त्यांचा किलबिलाट ऐकून कान मंत्रमुग्ध होतात.

टेकडीवरून दिसणारा परिसर

१) सोनारपाडा गाव, २) उंबार्ली गाव, ३) भाल गाव, ४) दावडी गाव ५) डोंबिवली परिसर, ६) मुंब्रादेवी मंदिर, ७) पनवेल परीसर, ८) अंबरनाथ परीसर, ९) श्रीमलंगगड किल्ला, १०) चंदेरी किल्ला११) ताहुली पिक, १२) दादी माँ, १३) कर्नाळा किल्ला, १४) म्हैसमाळ रांग, १५) कलावंतीणीचा सुळका आणि प्रबळगड, १६) कल्याण परिसर

ऑक्सिजन झोन डोंबिवलीपासून अगदी काही किमी अंतरावर असलेल्या क्षेत्रात गतिमान होत चालला आहे. इतक्या मोठ्या आकाराच्या टेकडीवर निसर्गसंपदा उभी करून निकामी झालेली फुफ्फुसे पुन्हा प्रज्वलित करण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT