मुंबई-नाशिक महामार्गावर रविवारी लाहे फाट्याजवळ एका महाकाय खड्ड्यामुळे दुर्घटना घडली. pudhari news network
ठाणे

खड्ड्यांमुळे मोठी दुर्घटना ! मुंबई - नाशिक महामार्गावर सात वाहनांचे टायर फुटून अपघात

पुढारी वृत्तसेवा

कसारा : मुंबई-नाशिक महामार्गावर रविवारी (दि.29) लाहे फाट्याजवळ एका महाकाय खड्ड्याचा अंदाज न आल्याने सात लहान वाहने व एका ट्रकचा अपघात होता होता सुदैवाने वाचला. मात्र या सर्व वाहनांचे टायर फुटले असून पाच कारचे दोन-दोन टायर तर अन्य कारचेही टायर फुटून मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान या कारमधून प्रवास करणारी कुटुंब भयभीत झाली. या कार चालकांनी मुंबई-नाशिक महामर्गावरील खड्ड्यांबाबत नाराजी व्यक्त करीत निषेध केला. दरम्यान मागील महिन्यात मुख्यमंत्र्यांनी मुंबई-नाशिक महामार्गांवरील वाहतूकदार, वाहन चालक प्रवासी यांना होणार्‍या त्रासामुळे या महामार्गाचा ठाणे ते वासिंद दरम्यान दौरा करून या महामार्गासाठी एक टास्क फोर्स कार्यरत केली होती.

मुंबई - नाशिक महामार्गावर भले मोठे खड्डे होऊन खड्ड्यांचे साम्राज पसरले आहे. तर दुसरीकडे महामार्गावरील आसनगाव हद्दीत संथगतीने चालू असलेले रेल्वे ब्रिज व वशिंदमध्येही चालू असलेले उड्डाण पुलाचे काम यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. महामार्गावरील चेरपोली घाट, शहापूर, आसनगाव ते वशिंदपर्यंत लागलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा अशा नियमितच्या वाहतूक कोंडीचा फटका रुग्णवाहिका, स्कूल बस यांना बसत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मुंबई-नाशिक महामार्गांवरील खड्डे आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटावा म्हणून 28 जुलै 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संबंधित यंत्रणांना आदेश देऊन घटनास्थळाची पाहणी केली होती. दरम्यान महामार्गाच्या निकृष्ट कामामुळे ठेकेदार, पोट ठेकेदार यांना मागील वर्षी 5 कोटीचा दंड प्रशासनाकडून करण्यात आला होता.

न्याय मिळवून देण्याची मागणी

पडघा ते कसारा घाट दरम्यान रस्त्याची चाळण झाली आहे. घाटातील संरक्षक कठडे तुटले आहेत, असे असताना राष्ट्रीय महामार्ग ठेकेदारावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. दरम्यान मुंबई-नाशिक महामार्गावरील दुरवस्था पाहता सर्व कामांची चौकशी करून कारवाई व्हावी व मुंबई-नाशिक महामार्गावरील प्रवास सुखकर व्हावा यासाठी लोकप्रतिनिधी यांनी संसदेत आवाज उठवून लाखो प्रवासी वाहन चालकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT