ठाणे : ठाणे जिल्ह्यातील दिवा परिसरातील एका सहा वर्षांच्या चिमुरडीचा भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याच्या एक महिन्यानंतर दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वेळेवर उपचार आणि रेबीज प्रतिबंधक लस घेऊनही तिचा जीव वाचू न शकल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
निशा शिंदे ही सहा वर्षांची मुलगी 17 नोव्हेंबर रोजी घराबाहेर खेळत असताना एका भटक्या कुत्र्याने तिच्या खांद्यावर आणि गालावर जोरात चावा घेतला. त्यानंतर कुटुंबीयांनी निशाला तातडीने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेले. तिला वेळापत्रकानुसार सर्व अनिवार्य इंजेक्शन्स देण्यात आली होती. दरम्यानच्या काळात तिची प्रकृती चांगली होती आणि तिने 3 डिसेंबर रोजी आपला वाढदिवस देखील साजरा केला होता.
15 डिसेंबर रोजी रेबीज प्रतिबंधक लसीचा शेवटचा डोस घेतल्यानंतर, दुसर्याच दिवशी 16 डिसेंबरला निशाला तीव्र ताप आला आणि डोकेदुखी सुरू झाली. निशाच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या वागण्यात अचानक हिंसक बदल झाले. ती आपले डोके बेडवर आदळू लागली आणि जवळच्या व्यक्तींना ओरखडू लागली. तिची प्रकृती खालावल्याने तिला पुन्हा शास्त्रीनगर रुग्णालयात आणि त्यानंतर अधिक उपचारांसाठी मुंबईतील पालिकेच्या रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तिथे तिचा मृत्यू झाला.