ठाणे : सत्ताधारी पक्षांनी पोलीस यंत्रणेचा गैरवापर, पैशाचे आमिष आणि निवडणूक अधिकाऱ्यांना हाताशी धरून सहा नगरसेवकांना बिनविरोध केल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. तसेच अर्ज माघारीच्या दिवशी एक पोलीस अधिकारी ठाकरे गटाच्या विक्रांत घाग या उमेदवाराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर नेत असल्याचे चित्रिकरण मनसे नेते अविनाश जाधव आणि शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे यांनी पत्रकार परिषेदेत सादर करीत लोकशाहीचा खून करणाऱ्या निवडणूक अधिकारी वृषाली पाटील आणि सत्वशीला शिंदे यांचे फोन कॉल, सीसीटीव्ही फुटेज, बँक अकाउंट तपासावे आणि त्यांच्या जागी नवीन निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली. उद्यापर्यंत त्या अधिकाऱ्यांबाबत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाला दिला आहे.
ठाणे महापालिकेत उमेदवारांचे जाणूनबुजून अर्ज बाद करून उबाठा, मनसे आणि अपक्ष उमेदवारांना अर्ज मागे घेऊन सात जणांना बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. हा प्रकार सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर, पोलीस यंत्रणेचा वापर, धमकावणे, गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे निवडणूक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घडवून आणला आहे, त्याची चौकशी करण्याची मागणी विचारे आणि जाधव यांनी केली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मनसेच्या उमेदवाराला पाच कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. एवढे पैसे कुठून आले याचा तपास करण्याची मागणी अविनाश जाधव यांनी करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले.
ठाणे महापालिका निवडणुकीत मनसेसह विरोधी पक्षातील उमेदवारांना सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून कपटनितीने अर्ज बाद करीत, पैशांचे आमिष दाखवून शिंदे सेनेचे ६ उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यात आले. या संदर्भातील अधिक माहिती देताना, राजन विचारे म्हणाले, या निवडणुकीत राज्यभरात ३३६ अर्ज अधिकाऱ्यांनी बाद केले असून तब्बल ६८ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. बंगल्यावर बोलावुन आमिष देत शिंदेचे साथीदार बिनविरोध निवडण्याचे अर्धेअधिक काम निवडणूक अधिकाऱ्यांनी केले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी वृषाली पाटील आणि सत्वशिला शिंदे यांच्या मोबाईलची तपासणी व्हायला हवी. त्यांची तातडीने बदली करून नवीन अधिकारी नियुक्त करून पुढील निवडणुका पार पाडाव्या असेही विचारे यांनी म्हटले आहे. ठाणे महापालिका यांनी लुटुन खाल्ली हे सत्ताधारी भाजपच्या आमदारानेच हे विधीमंडळात मांडल्याची आठवण करून देत साताऱ्याच्या गोदामावर धाड पडली त्याचा केंद्रबिंदु ठाण्यात ही असल्याचा गंभीर आरोपही जाधव- विचारे यांनी केले आहे.
पालिका निवडणुकीत शिवसेना, मनसे पक्षाचे तिकीट घेऊन उमेदवारी मागे घेणाऱ्या गद्दारांना क्षमा नाही. पक्षाला कोणतीही पूर्वसूचना न देता माघार घेणारे सध्या गायब आहेत. निवडणुका संपताच ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली आहे, त्यांचा पाहुणचार आम्ही घेणार ! असा इशारा राजन विचारे आणि अविनाश जाधव यांनी भर पत्रकार परिषदेत दिला आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती पत्र मंत्र्याच्या लेटर हेडवर दिल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी केला. इतक्या खालच्या स्थरावर राज्य सरकार आले आहे, हा पदाचा गैरवापर की शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची फसवणूक आहे, याचा खुलासा सरनाईक यांनी करावा अशी मागणी त्यांनी केली.