46.50 lakhs lime to 9 youths from Kalyan-Dombivli
कल्याण-डोंबिवलीतील 9 तरुणांना 46.50 लाखांचा चुना Pudhari File Photo
ठाणे

सैन्य दलात भरतीचे अमिष दाखवून तरुणांची 46.50 लाखांची फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : आपली सैन्य दलात ओळख असल्याने भरतीच्या माध्यमातून नोकरी लावण्याचे अमिष दाखवून तिघा बदमाशांनी रायगड, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरातील 9 बेरोजगार तरूणांकडून एकूण 46 लाख 50 हजार रूपये उकळले. पैसे देऊनही या बेकारांना नोकरी न देता पैसे लाटणाऱ्या कल्याण-डोंबिवलीमधील तिघा भामट्यांच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी 2020 पासून हा फसवणुकीचा प्रकार सुरू होता. हरिश्चंद्र गणपत जाधव (रा. दर्शन इमारत, कल्याण पूर्व), बाळकृष्ण गावडे (रा. संत ज्ञानेश्वर मार्ग,घाटकोपर), नवनाथ पोपलेकर (रा. देसलेपाडा, डोंबिवली) अशी फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपींची नावे आहेत. तर ज्ञानेश्वर वासुदेव भिलारे असे फसवणूक झालेल्याचे नाव आहे. तक्रारदार ज्ञानेश्वर हे सेवानिवृत्त असून ते रायगड जिल्ह्याच्या पोलादपूर तालुक्यातील दिवील गावचे रहिवासी आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी हरिश्चंद्र, बाळकृष्ण आणि नवनाथ या तिघांनी संगनमत करून तक्रारदार ज्ञानेश्वर भिलारे यांच्यासह नऊ जणांशी जानेवारी 2020 मध्ये संपर्क केला. त्यांनी आपली सैन्य दलात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी चांगली ओळख आहे. या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण सैन्य दलात नोकरी लागून देतो. यापूर्वी अशी कामे आम्ही केली असल्याचा दावा करत या तिघांनी फसवणुक केली.

फौजेत नोकरी मिळविण्यासाठी प्रत्येकी चार ते पाच लाख रूपये द्यावे लागतील, असेही या बदमाश्यांनी तरूणांना सांगितले. सैन्य दलात नोकरी मिळणार या हर्षोल्हासात तरूणांनी पैशांची जमवाजमव करून पैसे टप्प्याने भामट्यांच्या स्वाधीन केले. भामट्यांनी डोंबिवली पूर्वेतील उंबर्ली रोडला असलेल्या विद्यानिकेतन शाळा परिसरातील ओशन हाईट्स इमारतीत आणि महाड येथे हे सर्व व्यवहार झाले. पैसे उकळल्यानंतर वेगवेगळी कारणे देऊन भामटे तरूणांची दिशाभूल करत होते. मुलाखत आणि वैद्यकीय चाचण्या न करता तरूणांना सैन्य दलातील नियुक्तीपत्रे मिळणार होती. भामट्यांनी तरूणांना सैन्य दलात नोकरी देण्याची बनावट नियुक्तीपत्रे सैन्य दलाच्या लेटरहेडवर तयार करून ती पत्रे तरूणांना दिली. आपणास कोणतेही कष्ट न घेता सैन्य दलात नोकरी मिळाल्याच्या आनंदात तरूण होते. नियुक्तीपत्रांची खात्री केली असता तरूणांनी कपाळावर हात मारला.

यानंतर आपले पैसे परत देण्याचा तगादा तरूणांनी लावला तर त्यालाही फसवणूकदारांनी दाद दिली नाही. आपली फसवणूक झाल्याची पूर्ण खात्री पटल्यानंतर ज्ञानेश्वर भिलारे यांच्या पुढाकाराने तरूणांनी मानपाडा पोलिस ठाण्यात मंगळवारी तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या संदर्भात पोलिस उपनिरीक्षक भारत ढेंबरे यांच्यावर तपासाची धुरा सोपविण्यात आली आहे.

SCROLL FOR NEXT