calendar 2027 india with holidays and festivals Pudhari
ठाणे

2027 Calendar: पुढील वर्षी सप्टेंबरमध्येच गणपती- नवरात्री... 2004 नंतर पहिल्यांदाच घडलं; 5 सुट्ट्यांवरही सोडावे लागणार पाणी

Ganpati Festival Navratri 2027: नव्या वर्षात २ सूर्य तर ३ चंद्रग्रहण आणि सुपरमूनचे दर्शन, सर्व सण दहा दिवस आधी

पुढारी वृत्तसेवा

calendar 2027 india with holidays and festivals

ठाणे: आगामी नूतन वर्षात म्हणजे २०२७ मध्ये अधिक मास नसल्याने सर्व सण १० दिवस लवकर येणार आहेत. तसेच २०२७ हे वर्ष लीप इयर नसल्याने ३६५ दिवसही काम करावे लागणार आहे.

या वर्षात दोन सूर्य, तीन चंद्रग्रहणे आणि सुपरमूनचे दर्शन या खगोलीय घटना घडणार असून ५ सार्वजनिक सुट्ट्यांचे सण हे रविवारी आल्याने चाकरमान्यांना त्या सुट्ट्यांना मुकावे लागणार असल्याची माहिती प्रसिद्ध पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.

२०२७ मध्ये काय घडणार याविषयाची माहिती देताना सोमण म्हणाले की, श्रीमहावीर जयंती (१८ एप्रिल) तसेच स्वातंत्र्य दिन, पारसी न्यू इयर, ईद-ए-मिलाद १५ ऑगस्ट, गुरुनानक जयंती १४ नोव्हेंबर रविवारी असल्याने त्या सुट्ट्यांवर नोकरदारांना पाणी सोडावे लागणार आहे.

महाशिवरात्र (६ मार्च) , महाराष्ट्र दिन (१ मे ) श्रीगणेश चतुर्थी (४ सप्टेंबर), महात्मा गांधी जयंती (२ ऑक्टोबर), विजया दशमी (९ ऑक्टोबर), दिवाळी बलिप्रतिपदा ( ३० ऑक्टोबर) , ख्रिसमस (२५ डिसेंबर) हे सण शनिवारी येत असल्याचे माहिती सोमण यांनी दिली.

यावर्षी ३१ ऑक्टोबर २०२६पासून नूतन वर्षी २४ जानेवारी २०२७ आणि २५ जून २०२७ पासून २६ नोव्हेंबर २०२७ पर्यंत नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दोन सूर्यग्रहण आणि तीन चंद्रग्रहण

२०२७ मध्ये एकूण पाच ग्रहण होणार असून दोन सूर्य ग्रहणे आणि तीन छायाकल्प चंद्रग्रहणे होणार आहेत. त्यापैकी ६ फेब्रुवारीचे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. २ ऑगस्टचे खग्रास सूर्यग्रहण भारतातून खंडग्रास स्थितीत दिसणार आहे.

2027 Festival Calendar

या सूर्यग्रहणाची खग्रास स्थिती स्पेन, जिब्राल्टर, मोरोक्को, अल्जेरिया, ट्युनिशिया, लिबिया, ईजिप्त सुदान, सौदीअरेबिया, येमेन, सोमालिया येथून दिसणार आहे. या शतकातील जास्त वेळ (६ मिनिटे २३ सेकंद) खग्रास स्थिती दिसणारे हे सूर्यग्रहण असेल. यापूर्वी २२ जुलै २००९ रोजी झालेल्या सूर्यग्रहणात

६ मिनिटे ३९ सेकंद खग्रास स्थिती दिसली होती. यानंतर ३ जून २११४ रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणात ६ मिनिटे ३२ सेकंद खग्रास स्थिती दिसेल, अशी भावी काळातील माहिती त्यांनी दिली.

२० फेब्रुवारी, १८ जुलै रोजी होणारी छायाकल्प चंद्रग्रहणे भारतातून दिसणार आहेत. १७ ऑगस्ट रोजी होणारे छायाकल्प चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही, २२ जानेवारी रोजी सुपरमूनचे तर ४ मार्च, ३० नोव्हेंबर रोजी चंद्र-शुक्र युतीचे छानदार दर्शन होणार आहे, अशी खगोलीय घटनांची माहिती त्यांनी दिली.

२०२७ मध्ये सर्व सण सुमारे १० दिवस लवकर येणार आहेत. गणपती बाप्पाचे आगमन शनिवार ४ सप्टेंबर रोजी होणार असून अनंत चतुर्दशी अकराव्या दिवशी येणार आहे. गणेश चतुर्थी आणि ऋषि पंचमी एकाच दिवशी आहे.

आश्विन शुक्ल प्रतिपदा क्षयतिथी असल्याने भाद्रपद कृष्ण अमावास्येच्याच दिवशी गुरुवार ३० सप्टेंबर रोजी सकळी ८-०५ वाजता अमावस्या संपल्यावर घटस्थापना - नवरात्रारंभ होणार आहे. यापूर्वी २००४ मध्ये असे आले होते. यानंतर २०३६ मध्ये अशा तिथी असतील असेही सुतोवाच त्यांनी केले.

सौर वर्ष आणि चांद्र वर्ष यांच्यामध्ये

१०-११ दिवसांचा फरक असतो. चांद्र वर्ष १०-११ दिवसांनी लहान असल्यामुळे दरवर्षी सण-उत्सव १० दिवस लवकर येतात. परंतु अधिक महिना आला की सण-उत्सव २० दिवस उशिरा येतात. चांद्र आणि सौर वर्षाचा मेळामुळे आणि ठराविक सण ठराविक ऋतूत यायला पाहिजेत, त्यामुळे दरवर्षी सण हे १०-११ दिवस लवकर येत असतात. अधिक महिना (तीन वर्षांनी) आला की, या सणाच्या तिथी उशिरा असतात, असे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT