Thane railway station file photo
ठाणे

नवीन ठाणे रेल्वेस्थानकाच्या कामासाठी पालिकेचे १८५ कोटी वाचणार

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : नवीन ठाणे रेल्वे स्टेशन परिचलन क्षेत्रातील काम रेल्वे करणार तर परिचलन क्षेत्राबाहेरील काम ठाणे स्मार्ट सिटी करणार असा निर्णय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतला आहे. यासंदर्भात कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. दोन्ही खासदारांच्या पुढाकारामुळे ठाणे महापालिकेचे १८५ कोटी वाचणार आहेत.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशन, महाराष्ट्र शासन आणि ठाणे महानगरपालिका यांच्यावतीने ठाणे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या नवीन रेल्वे स्टेशनच्या बाबतीत मंगळवारी खा. श्रीकांत शिंदे आणि खा. नरेश म्हस्के यांच्यात महत्वाची बैठक झाली. या बैठकीत नवीन रेल्वे स्टेशनचे परिचलन क्षेत्रातील सर्व कामे रेल्वे मंत्रालयाच्या वतीने करण्यात येतील, अशी ग्वाही रेल्वे मंत्र्यांनी दिली आहे. यासाठी लागणारा निधीही रेल्वे मंत्रालय देईल, असे रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

ठाणे येथे मनोरुग्णालयाच्या जागेत ठाणे स्मार्ट सिटीअंतर्गत नवीन रेल्वे स्टेशन बांधण्यात येत आहे. यामध्ये रेल्वे परिचलन क्षेत्रामधील ट्रॅक बांधणे, रेल्वे स्टेशन इमारत बांधकाम बांधणे आदी आनुषंगिक कामे आणि परिचलन क्षेत्राच्या बाहेरील डेक, रॅम्प आदी अनुषंगिक कामे स्मार्ट सिटीच्यावतीने करण्यात येणार आहेत.

सदरची कामे जलदगतीने व्हावीत आणि रेल्वे मंत्रालयाच्या स्तरावर तातडीने निर्णय व्हावा, परिचलन क्षेत्रामध्ये करण्यात येणारी कामे रेल्वे मंत्रालयाने त्यांच्या निधीमधून करावी यासाठी दोन्ही खासदारांनी रेल्वे मंत्र्यांची भेट घेतली. बैठकीच्या सुरुवातीस महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या प्रकल्पाविषयीची पार्श्वभूमी मांडली.

कामे रेल्वे मंत्रालय निधीतून

या प्रकल्पामुळे ठाणे शहराला कसा फायदा होणार आहे, याची माहिती दिली. त्यानंतर खा. डॉ. श्रीकांत शिंदे आणि खा. नरेश म्हस्के यांनी परिचलन क्षेत्रामध्ये जी कामे करण्यात येणार आहेत. ती सर्व कामे रेल्वे मंत्रालयाने त्यांच्या निधीमधून करण्याची विनंती केली. खासदारांनी केलेली विनंती त्वरित मान्य करून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे परिचलन क्षेत्रामध्ये करण्यात येणारी कामे ही रेल्वे मंत्रालय त्यांच्या निधीतून करेल. या कामासाठी भविष्यात होणारी भाववाढ आणि त्या कामासाठी लागणारा अतिरिक्त निधीही रेल्वे मंत्रालय करेल अशी ग्वाही दिली.

ना हरकत तरतूद रद्द करावी

त्याचबरोबर परिचलन क्षेत्राच्या बाहेर ठाणे स्मार्ट सिटीतर्गत करण्यात येणाऱ्या कामासाठी मेट्रो प्रकल्पाचे काम सोडून उर्वरित कामासाठी रेल्वेच्या ना हरकत घेण्याची तरतूदही रद्द करण्यात यावी ही खासदारांची मागणीही रेल्वे मंत्र्यांनी मान्य केली. यावेळी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी रेल्वे मंत्री आणि खा. डॉ. श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांचे विशेष आभार मानले. यावेळी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT