भिवंडी : संजय भोईर
अनेक वेळा घरातून आई-वडील रागावल्यावर तर काही वेळा प्रेमप्रकरणात फसव्या आणाभाकांमुळे वाहवत गेल्याने अल्पवयीन मुले मुली मोठ्या प्रमाणावर बेपत्ता होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अल्पवयीन बेपत्ता मुलांच्या तपासासाठी या गुन्ह्यांची नोंद अपहरण म्हणून गुन्हा दाखल करण्याची तरतूद केल्यानंतर हे गुन्हे प्रकर्षाने समोर येऊ लागले. ज्यामुळे अल्पवयीन मुलामुलींच्या बेपत्ता होणार्यांची संख्या सर्वांसमोर येऊ लागली.
भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रातून मागील सहा महिन्यात हरवलेल्या 142 अल्पवयीन मुला मुलींपैकी तब्बल 126 मुला मुलींचा शोध घेण्यात भिवंडी पोलिसांना यश मिळाले आहे.
घरातील अल्पवयीन मुलांच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण मागील काही दिवसांमध्ये वाढले आहे. ज्यामुळे पालक वर्गात चिंतेचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. शालांत परीक्षांचे निकाल लागल्यानंतर परीक्षेत मार्क कमी पडल्यामुळे घरातील पालक रागावल्याने अनेक वेळा मुलं घर सोडून जात असतात.
आजच्या काळात मुलांच्या सुद्धा अपेक्षा वाढल्या आहेत, त्या कुटुंबीयांकडून पूर्ण न झाल्यास मुले घर सोडून निघून जातात. तर अनेकदा अल्पवयीन तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेले जात आहे. ज्यामुळे मार्च, एप्रिल, मे महिन्यात अल्पवयीन मुलांच्या बेपत्ता होण्याच्या घटना वाढतात.
भिवंडी या परराज्यातील लोकसंख्येचा भरणा अधिक असलेल्या शहरात बर्याच वेळा बेपत्ता झालेल्या मुली या परराज्यात पळवून नेल्या जातात. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर शोधण्या साठी ताण येत असतो. शहरातून जानेवारी ते जून या सहा महिन्याच्या काळात 142 अल्पवयीन मुलेमुली बेपत्ता झाले. त्यामध्ये 47 मुले तर 95 मुलींचा समावेश आहे.
यापैकी 44 मुले व 82 मुली यांचा शोध स्थानिक पोलिसांनी लावला आहे. तर 3 मुले व 13 मुली असे 16 जणांचा शोध लागणे बाकी आहे. विशेष म्हणजे बेपत्ता अनेक मुली या परराज्यात घेऊन गेल्याने अनेकांचा शोध परराज्यातून पोलीस यंत्रणेने लावल्याची माहिती पोलीस उपायुक्त शशिकांत बारोट यांनी दिली आहे.
शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात बेपत्ता अल्पवयीन मुला-मुलींच्या शोधासाठी स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहे. अनेक प्रकरणात अल्पवयीन पीडितांचा परराज्यातून शोध घेण्यात येतो. भिवंडी परिमंडळ क्षेत्रात बेपत्ता मुला मुलींचा शोध गांभीर्याने घेतला जात असल्याने तपासाचे प्रमाण 90 टक्के आहे. अशा बेपत्ता पीडितांचा शोध घेऊन त्यांना परत आणल्यानंतर सर्वप्रथम त्यांचे समुपदेशन केले जाते. त्यानंतर त्यांना पालकांच्या स्वाधीन केले जाते. बर्याच वेळा मुलींचे बेपत्ता काळात शारीरिक शोषण झाल्याचे समोर येते. अशा प्रकरणात पीडित अल्पवयीन मुलींची शारीरिक तपासणी करून पोस्को अंतर्गत गुन्हे सुद्धा दाखल केले जातात अशी माहिती पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली आहे.
शहरातील नारपोली परिसरातील 14 वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी पहाटेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही मुलगी 25 जुलै रोजी पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास घरातून गेली असता कोणीतरी अज्ञात इसमाने तिच्या अज्ञातपणाचा फायदा घेऊ न तिला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयावरून तिच्या आईच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सध्याच्या तंत्रयुगात प्रत्येकाच्या हाती मोबाईल आले आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात बर्याच वेळा आई-वडील हे दोघेही नोकरी करणारे असल्यामुळे त्यांचा व त्यांच्या मुलां मधील संवाद कमी होत चालला आहे. तर आजकाल नशेसाठी अमली पदार्थांची सहज उपलब्धता यामुळे स्वतंत्रवृत्ती वाढीस लागल्याने अल्पवयीन बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. यासाठी पालकांनी पुढाकार घेऊन मुलांशी संवाद साधणे गरजेचे आहे. नव्हे तर मुलांशी बोलण्यासाठी वेळ काढणे गरजेचे आहे.डॉ. विजय तेली, मानसोपचार तज्ज्ञ, ठाणे जिल्हा रुग्णालय