भिवंडी : भिवंडी तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई-वडोदरा महामार्गाचा वापर स्थानिकांना करता यावा यासाठी लामज येथे एंट्री-एक्सिट असावी अशी मागणी सुरवातीपासून खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी केंद्र सरकार कडे लावून धरल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने मंजुरी देत या कामासाठी 132 .28 कोटी रुपयांची निविदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जाहीर केली आहे. त्यामुळे लवकरच या कामाला सुरुवात होणार असून या एंट्री - एक्सिट मुळे भिवंडीकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार असून औद्योगिक विकासाला देखील चालना मिळणार आहे.
या मागणीसाठी संघर्ष समितीने भिवंडीचे खासदार बाळ्या मामा यांच्याकडे पाठपुरावा केला होता. खा. बाळ्या मामा यांनी संघर्ष समितीच्या सदस्यांसोबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत या विषयाचा सतत पाठपुरावा केंद्रीय स्तरावर केला होता. खासदार बाळ्या मामा यांच्या मागणीला केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सकारत्मकता दाखवत यासाठी निधी मंजूर केला होता.
अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 16 जानेवारी रोजी या कामाची निविदा जाहीर केली आहे. या कामामुळे मुंबई-वडोदरा महामार्गावरून प्रवास करतांना भिवंडी करांचा प्रवास सुखकर होणार असून औद्योगिक विकासात देखील वाढ होणार आहे. या बाबतची मागणी आपण सतत लावून धरली होती. अखेर आमच्या मागणीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व आता या कामाची निविदा देखील जाहीर झाली त्यामुळे आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जाहीर आभार मानतो अशी प्रतिक्रिया खासदार बाळ्या मामा यांनी दिली आहे.