पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी बांधणार 132 कृत्रिम तलाव  pudhari photo
ठाणे

POP Ganesh idol immersion : पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी बांधणार 132 कृत्रिम तलाव

ठाण्यात गणेश मंडळ, महापालिका, वाहतूक विभागाची झाली बैठक

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : उच्च न्यायालयाने पीओपी गणेशमूर्तींना परवानगी दिल्यामुळे पीओपी मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र 6 फुटापर्यंतच्या पीओपीच्या मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे निर्देश दिल्याने ठाणे महापालिका क्षेत्रात कृत्रिम तलाव वाढवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव ह्यांनी महापालिका अधिकार्‍यांना कृत्रिम तलावाची संख्या वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.

येत्या काही दिवसांवर गणेश उत्सवाला सुरुवात होणार असून हा उत्सव व्यवस्थित पार पडावा यासाठी महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. महापालिकेच्या वतीने मंगळवारी सकाळी ठाण्यातील गणेश मंडळ, वाहतूक विभाग व पोलीस प्रशासनाची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीस पालिका आयुक्त सौरभ राव उपस्थित होते. यामध्ये गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी या उत्सवासंदर्भात प्रशासनाची कोणती मदत अपेक्षित आहे. याविषयी भूमिका व्यक्त केली. तर पालिका प्रशासनाकडून काय तयारी करण्यात येणार आहे, याची माहिती गणेश मंडळांना दिली.

राज्य उत्सवाचा दर्जा मिळालेला गणेशोत्सव यंदाही उत्साहाने साजरा करूया. नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी बाप्पाच्या आशीवार्दाने उत्सव निर्विघ्नपणे साजरा करूया, असे आवाहनही आयुक्त सौरभ राव यांनी केल. आयुक्त राव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस गणेशोत्सव मंडळ प्रतिनिधी, विक्रेते, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट, उपायुक्त मनीष जोशी, शंकर पाटोळे, मधुकर बोडके, दिनेश तायडे, सचिन सांगळे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांसह महापालिका, महावितरण, टोरँट पॉवर, स्वंयसेवी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावर्षी 24 कृत्रिम तलाव, 74 टाकी विसर्जन व्यवस्था, 15 फिरत्या विसर्जन व्यवस्था, 09 घाट विसर्जन व्यवस्था व 10 मूर्ती स्वीकृती केंद्र अशा एकूण 132 ठिकाणी विसर्जन व्यवस्था करण्यात येणार आहे. गतवर्षी एकूण 88 विसर्जन व्यवस्था होत्या.

दोन सत्रात स्वतंत्र मनुष्यबळ

विसर्जनाच्या ठिकाणी मनुष्यबळ वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. ती लक्षात घेऊन मनुष्यबळ वाढवण्यात येईल. तसेच, दोन सत्रात मनुष्यबळाची व्यवस्था करण्यात येईल. त्यामुळे कार्यक्षमतेत सुधारणा होईल, असा विश्वास आयुक्त राव यांनी व्यक्त केला. घाट विसर्जनस्थळी क्रेन आणि वाढीव बार्ज असावेत, अशी सूचना गणेशोत्सव समन्वय समिती आणि पोलिसांनी केली आहे. त्याबाबत विचार करण्याचे आश्वासनही आयुक्त राव यांनी दिले.

समन्वय अधिकारी

गणेशोत्सव मंडळ, पोलीस यांना महापालिकेकडून काही व्यवस्था हवी असल्यास किंवा व्यवस्थेत काही त्रुटी असल्यास निराकरणासाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात येत आहे. उपायुक्त (अतिक्रमण) शंकर पाटोळे महापालिके- कडून त्यासंदर्भातील समन्वय अधिकारी म्हणून काम पाहतील, असेही आयुक्त राव यांनी सांगितले. स्थानिक पोलीस, मंडळ पदाधिकारी व महापालिका अधिकारी यांनी आपापल्या भागातील विसर्जन व्यवस्थेची संयुक्त पाहणी करावी. त्यात लक्षात येणार्‍या बाबींची नोंद घेऊन स्थानिक सहाय्यक आयुक्तांनी कार्यवाही करण्याचे निर्देशही आयुक्त राव यांनी दिले.

विसर्जन व्यवस्थेचे विकेंद्रीकरण

एकाच ठिकाणी विसर्जनासाठी गर्दी होऊ नये म्हणून महापालिकेने जास्तीचे कृत्रिम तलाव नियोजित केले आहेत. तसेच, मंडळांनी नवरात्रौत्सवाच्या काळात होणार्‍या गैरसोयीचा मुद्दा मांडला असून त्याबाबत महापालिका प्रशासन दक्ष राहील, असे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी स्पष्ट केले. प्रशासन आणि गणशोत्सव मंडळ यांनी एकत्रितपणे समन्वयाने सण साजरा करू. कार्यकर्तेच प्रशासनाचे कान, नाक, डोळे आहेत. स्थानिक पोलीस स्टेशन जेव्हा मंडळांच्या बैठका घेतील तेव्हा सर्व यंत्रणांचे स्थानिक अधिकारीही तेथे उपस्थित राहतील, असे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी स्पष्ट केले.

बैठकीच्या प्रारंभी, पर्यावरणपूरक उत्सव साजरे करण्यासाठी मा. उच्च न्यायालयाचे आदेश, त्याअनुषंगाने राज्य शासनाने जाहीर केलेली कार्यपद्धती याची सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली. तसेच, ठाणे महापालिकेने संपूर्ण विसर्जन व्यवस्थेची माहिती देणारे हरित विसर्जन अ‍ॅप तयार केले आहे. ते लवकरच नागरिकांसाठी सर्व मोबाईल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार असल्याचेही प्रधान यांनी सांगितले. बैठकीत, मंडळांच्या वतीने विसर्जन व्यवस्थेबाबत ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीचे उपाध्यक्ष रवींद्र पालवे, उल्हास बर्डे, विनायक सुर्वे, वासुदेव अलगुज, विकी चॅको, विशाल महाडिक आदींनी विविध मुद्दे मांडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT