dog bite
श्वान दंश file photo
ठाणे

Thane | भिवंडीत तीन दिवसांत 120 नागरिकांना श्वान दंश

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी : शहरात भटक्या श्वानांची आणि त्यामुळेच पिसाळलेल्या श्वानांची संख्या वाढीस लागलेली आहे. दरम्यान भिवंडीत तीन दिवसांत 120 नागरिकांना श्वान दंश झाल्याची घटना घडली आहे.

भटक्या श्वानांचा त्रास बहुतांश वेळा रात्रीच्या वेळी नागरिकांना दुचाकी चालकांना होत असताना या भटक्या श्वानांपैकी काही पिसाळल्याने अनेकांना श्वान दंश करण्याच्या घटना भिवंडी शहरात वाढीस लागलेल्या आहेत.

दरम्यान 7 व 8 जुलै या दोन दिवसात तब्बल 135 जणांना श्वान दंश झाल्याची घटना समोर आली असून, संपूर्ण जून महिन्यामधील तीस दिवसांत 886 जणांना श्वान दंश झाल्याची माहिती स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षका डॉ. माधवी पंधारे यांनी दिली आहे. 7 जुलै रोजी कामतघर परिसरात 60 श्वान दंश झाले होते, तर शांतीनगर भागात 8 जुलै रोजी 45 जणांना श्वान दंश झाले. या व्यतिरिक्त इतर भागातही श्वान दंशाच्या घटना घडल्या असून या दोन दिवसांत एकूण 135 रुग्णांना रेबीज प्रतिबंधक पहिला डोस देण्यात आला आहे.

रुग्णालयात रेबीज डोसचा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती अधिक्षका डॉ. माधवी पंधारे यांनी दिली आहे. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण मागील कित्येक वर्षांपासून बंद असून आयुक्त अजय वैद्य यांनी 2023 पासून शहरातील भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यासाठी दोन वेळा निविदा प्रक्रिया राबविली परंतु संस्थांकडून प्रतिसाद आला नाही. दरम्यान आचारसंहिता सुरू झाली होती. 8 जुलै रोजी या बाबतच्या फाईल्सवर स्वाक्षरी करून संबंधित विभागाला तातडीने निविदा प्रक्रिया राबविण्याच्या सूचना दिल्या असून आठ दिवसांमध्ये भिवंडी शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी यंत्रणा सज्ज करणार असल्याची माहिती पालिका आयुक्त तथा प्रशासक अजय वैद्य यांनी दिली आहे.

SCROLL FOR NEXT