डोंबिवली : तंत्रज्ञान क्षेत्रात कल्याणच्या तरुण प्रतिभेने पुन्हा एकदा जागतिक स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. जागतिक स्तरावर आयोजित प्रतिष्ठित टेक्नॉवेशन फॉर गर्ल्स स्पर्धेत कल्याणच्या १२ वर्षीय एलीना बन्सलने कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करून तयार केलेल्या शक्तिपाथ या नाविन्यपूर्ण प्रोग्रामने अंतिम पाच मध्ये येण्याचा मान पटकावला आहे. या यशासोबतच एलीनाने आशिया खंडामध्ये तिच्या विभागात प्रथम क्रमांकावर येण्याचा बहुमान मिळविला आहे.
विविध देशांतून आलेल्या या जागतिक स्पर्धेचा अंतिम सोहळा नुकताच बेंगळूर येथे दिमाखात पार पडला. या अंतिम फेरीत जगभरातील अमेरिका, सिंगापूर, आयर्लंड, अर्जेंटिनासारख्या देशांमधील सर्वोत्तम प्रोजेक्ट्सनी सहभाग घेतला होता.
या अटीतटीच्या व उच्चस्तरीय स्पर्धेत एलीनाच्या शक्तिपाथ या एआय-आधारित प्रोजेक्टने परिक्षकांची मने जिंकली आणि अंतिम पाच स्पर्धकांत स्थान मिळवत कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला व जागतिक पातळीवर कल्याणचे नाव उंचावले. बंगळूर येथील मुख्य सोहळ्यापूर्वी पार पडलेल्या आशिया खंडातील सर्व देशांचा समावेश असलेल्या फेरीत एलीनाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांकाने येण्याचा मान पटकवला होता.
प्रादेशिक पातळीवरील या सुवर्णयशानंतर जागतिक स्तरावरही अंतिम पाच स्पर्धकांमध्ये स्थान मिळवून तिने आपल्या अफाट बुद्धिमत्तेची आणि कौशल्याची चुणूक दाखवून दिली आहे. एलीना ही मूळची कल्याणची असून ती सध्या आई-वडिलांसह सिंगापूर येथे वास्तव्यास आहे. आपल्या या उपक्रमाची सुरुवात तिने कल्याणमधील काही शाळांपासूनच केली होती.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शक्तिपाथ
एलीनाने विकसित केलेले शक्तिपाथ हे ॲप्लिकेशन आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या प्रोग्रॅमची निर्मिती केली असल्याचे एलिनाने सांगितले आहे. सामाजिक किंवा तांत्रिक समस्येवर प्रभावी आणि नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याच्या उद्देशाने या प्रोग्रामची निर्मिती करण्यात आली असून, तिच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.