Uddhav Thackeray |
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटी वाढल्या आहेत. ठाकरे बंधूंच्या रविवारच्या भेटीचे निमित्त ठरले खासदार संजय राऊत यांच्या नातीचे बारसे. मुंबई क्रिकेट क्लब अर्थात एमसीए येथील या कौटुंबिक सोहळ्यात ठाकरे बंधूंमधील गप्पांचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले.
पाठोपाठ राज ठाकरे यांनी थेट मातोश्री निवासस्थान गाठत उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे मुंबई महापालिकेसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुंकासाठी ठाकरेंच्या राजकीय युतीच्या चर्चांना जोरात आहेत.
रविवारी संजय राऊत यांच्या नातीच्या बारशाच्या निमित्ताने ठाकरे बंधू एमसीए येथे एकत्र आले. यावेळी संजय राऊत यांच्या उपस्थितीत उद्धव आणि राज यांच्यात रंगलेल्या गप्पांचा व्हिडीओ व्हायरल झाला. तर एमसीएतून राज ठाकरे बाहेर पडत असताना उद्धव ठाकरेंसह रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेही निरोपासाठी बाहेर आले.
सर्वांशी हस्तांदोलन करत राज ठाकरे एमसीएतून रवाना झाले. त्यानंतर राज हे अचानक उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर पोहोचले. इथे दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चाही झाली. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांत वेगवेगळ्या निमित्ताने झालेली ठाकरे बंधूंची ही पाचवी भेट आहे. राज्य सरकारने हिंदी सक्तीबाबतचा जीआर मागे घेतल्यानंतर 5 जुलै रोजी सर्वप्रथम दोन्ही ठाकरे बंधू मराठी भाषा मेळाव्याच्या निमित्ताने एका व्यासपीठावर आले.
चर्चेचा तपशील बासनात!
‘मातोश्री’वर दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील मिळाला नसला तरी युतीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.