पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या शहरात झिकाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या पार्श्वभुमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गर्भवती महिलांची तपासणी करून आणि झिका पॉझिटिव्ह आलेल्या गर्भवती मातांच्या गर्भाच्या वाढीचे निरीक्षण करून राज्यांनी सतत जागरुकता ठेवण्याचे आवाहन केले आहे. Zika virus
महाराष्ट्रातील झिका विषाणूची नोंदवलेली प्रकरणे पाहता, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्याला मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामध्ये म्हटले आहे, "राज्याने झिका विषाणूच्या संसर्ग गर्भवती महिलांची तपासणी करून आणि माता पॉझिटिव्ह आढळलेल्या प्रकरणांमध्ये गर्भाच्या वाढीचे निरीक्षण करून सतत दक्षता ठेवण्याचा सल्ला दिला आहे. परिसर एडिस डासांपासून मुक्त राहावा यासाठी आरोग्य सुविधांना नोडल अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर निवासी क्षेत्रे, कामाची ठिकाणे, शाळा, बांधकाम साइट्स, संस्था आणि आरोग्य सुविधांमध्ये कीटकशास्त्रीय देखरेख आणि वेक्टर नियंत्रण कृती वाढवण्याचे आवाहनही राज्यांना करण्यात आले आहे.
सध्या शहरात झिकाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेमध्ये (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. सध्या एनआयव्हीकडे देशभरातून 106 नमुने तपासणीसाठी आले असून, त्यातील 86 महाराष्ट्रातील आणि इतर नमुने पंजाब, बिहार, बडोदा आणि सिल्व्हासा येथील आहेत, अशी माहिती एनआयव्हीचे संचालक डॉ. नवीन कुमार यांनी दिली. डॉ. नवीन कुमार म्हणाले, सध्या पुण्यात आढळून येणारा झिका विषाणूचा प्रकार एशियन लिनिएजचा असून, या स्वरूपाची लक्षणे अत्यंत सौम्य असतात. त्यामुळे सध्याच्या झिकाच्या नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग केले जात आहे. यामध्ये व्हायरल लोड कमी प्रमाणात दिसून येत आहे. झिका नमुन्यांची तपासणी पीसीआर पद्धतीने केली जात आहे.
रक्ताच्या नमुन्याच्या तपासणीमधून एकाच वेळी डेंग्यू, चिकनगुनिया आणि झिकाचे निदान करता येते. एनआयव्हीमध्ये सध्या एका दिवशी 50 नमुन्यांची तपासणी करता येणे शक्य आहे. झिकाच्या प्रादुर्भावाबाबत सोमवारी केंद्र शासन, एनआयव्ही, सार्वजनिक आरोग्य विभाग, महापालिका यांची ऑनलाईन बैठक पार पडली. या वेळी एनआयव्हीतर्फे सर्व्हेलन्सबाबत सूचना करण्यात आल्या आणि उपाययोजनांवरही चर्चा झाली.