Supriya Sule Raksha Bandhan Ajit Pawar Pudhari
महाराष्ट्र

Supriya Sule: ‘आजही वाटतं, तू अचानक येशील...’; राखीपौर्णिमेला सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट, दादाच्या आठवणींनी डोळे पाणावले

Supriya Sule Raksha Bandhan Emotional Post: राखीपौर्णिमेनिमित्त सुप्रिया सुळे यांनी आपल्या दिवंगत दादाच्या आठवणीत अत्यंत भावूक फेसबुक पोस्ट शेअर केली.

Rahul Shelke

Supriya Sule Raksha Bandhan Emotional Post: राखीपौर्णिमेचा सण म्हणजे भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा, प्रेमाचा आणि विश्वासाचा दिवस. मात्र यंदाची राखीपौर्णिमा खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी अत्यंत भावनिक आहे. सात महिन्यांपूर्वी अचानक दादाला गमावल्याच्या दुःखातून त्या अजूनही पूर्णपणे सावरलेल्या नसल्याचे त्यांच्या पोस्टमधून दिसून येत आहे.

राखीपौर्णिमेनिमित्त सुप्रिया सुळे यांनी आपल्या दादाच्या आठवणींना उजाळा देत मनातील वेदना शब्दांत व्यक्त केली. “आज राखीपौर्णिमा... पण यावेळी तू सोबत नाहीस, ही जाणीव मनाला खूप अस्वस्थ करत आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

‘सात महिन्यांपूर्वीची ती भीषण सकाळ... आजही विश्वास बसत नाही’

पोस्टमध्ये सुप्रिया सुळे यांनी सात महिन्यांपूर्वीच्या त्या दुःखद घटनेची आठवण काढली. “सात महिन्यांपूर्वीची ती भीषण सकाळ आणि तुझं अचानक निघून जाणं... यावर आजही विश्वास बसत नाही,” असे म्हणत त्यांनी दादाच्या अचानक जाण्याने निर्माण झालेल्या वेदनेची जाणीव व्यक्त केली.

लहानपणापासून एकत्र वाढताना झालेली भांडणं, एकमेकांवरील प्रेम आणि एकमेकांविषयीचा अभिमान, हाच त्यांच्या नात्याचा खरा पाया होता, असेही त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.

‘आजही वाटतं, तू अचानक येशील...’

दादाच्या आठवणींमध्ये हरवलेल्या सुप्रिया सुळे यांनी पुढे लिहिले की, “आजही वाटतं, तू कुठूनतरी अचानक येशील, राखी बांधून घेशील, बहिणींसोबत गप्पागोष्टी करत पुन्हा कुटुंबात रमून जाशील...” या शब्दांत त्यांनी आपल्या दादाविषयीची ओढ आणि मनातील हळवी भावना व्यक्त केली.

‘तुझ्या नसण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही’

दादाच्या जाण्याने आयुष्यात निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही, अशी वेदनाही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. मात्र तो जिथे असेल तिथून त्याचे प्रेम आणि आशीर्वाद कुटुंबाच्या सदैव पाठीशी राहावेत, अशी भावनिक प्रार्थनाही त्यांनी केली.

“तू जिथे असशील, तिथून तुझं प्रेम आणि आशीर्वाद असेच सदैव पाठीशी राहू दे!” असे म्हणत त्यांनी आपल्या पोस्टचा शेवट केला.

राखीपौर्णिमेच्या दिवशी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलेल्या या हृदयस्पर्शी भावना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून, अनेकांनी त्यांच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT