सोलापूर : अंबादास पोळ : औद्योगिक मूल्य वाढीसाठी कौशल्य मजबुतीकरण (एसटीआरआयव्हीई) या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सोलापूरची निवड करण्यात आली आहे. या अंतर्गत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून दोन कोटी 50 लाख रुपयांचा निधीही सोलापूरच्या आयटीआयला मंजूर करण्यात आला असून त्यातील 80 लाख प्रत्यक्ष मिळाले आहेत.
महाराष्ट्र सरकारने राज्यात केंद्राचा कौशल्य मजबुतीकरण योजनेसाठी औद्योगिक मूल्यवर्धन प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. या योजनेचा उद्देश औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून उमेदवारांना प्रदान करण्यात येणारे कौशल्य-प्रशिक्षण सुधारणे हा आहे. यामध्ये नवीन मशिनरी खरेदी करणे, वितरण गुणवत्ता एकत्रित करणे आणि वाढवणे हे उद्दिष्ट आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 72 आयटीआयना या निर्णयाचा फायदा झाला आहे. या प्रकल्पासाठी केंद्राकडून राज्याला सुमारे 450 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. त्यापैकी 2 कोटी 50 लाख रुपयांचा निधी सोलापूर जिल्ह्यातील निवड झालेल्या एकमेव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मिळणार आहे.
आयटीआय शिक्षणासाठी मुलींचा अधिकाधिक कल वाढावा यासाठी मुलींना घरापासून संस्थेपर्यंत येण्यासाठी वाहतूक भाडे त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.