सोलापूर

सोलापूर : वैरागमधील मुख्य रस्त्याची कामे अर्धवट

अमृता चौगुले

वैराग (सोलापूर) : पुढारी वृत्तसेवा : वैराग शहरात गेल्या पाच-सहा महिन्यांपासून सोलापूर-बार्शी रोडच्या नूतनीकरणाचे काम चालू आहे. वैरागमधील मुख्य असणार्‍या बार्शी सोलापूर रोड हा शहाजीराव पाटील सांस्कृतिक भवनजवळील 45 गाळेधारकांच्या समोरील रस्ता खोदून ठेवला आहे, याचा नाहक त्रास या दुकानदारांना व नागरिकांना होत आहे, हा रस्ता त्वरित दुरूस्त करण्याची मागणी गाळेधारकांसह समस्त वैरागकरांतून होत आहे.

सोलापूर-बार्शी रस्त्याचे नूतनीकरणाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. सध्या काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, वैराग शहरातच रस्त्याचे व गटारीचे काम संथगतीने चालू असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत रस्ता खोदाई केल्याने तेथील असणार्‍या गाळेधारकानां त्रास होत आहे. रस्ता 4 दिवस खोदून ठेवल्याने वैरागकर नागरिकांना व व्यापार्‍यांना, वाहनधारकांना जाण्यास अडथळा निर्माण होत आहे.

वैराग बसस्थानकापासून दीड किलोमीटर अंतरावर गटार व रस्त्याचे काम आवताडे कन्ट्रक्शने अपूर्ण ठेवले आहे. कन्स्ट्रक्शनच्या कामगारांना या कामाची चौकशी करण्यासाठी फोन केला असता फोन घेऊ शकले नाहीत. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी यांना संपर्क केला असता ते संबंधित कामाची चौकशी करून लवकर काम करायला सांगितले आहे, असे म्हणाले.

सोलापूर-बार्शी रोडचे नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, वैरागजवळ बार्शी रोडवरील 45 गाळेधारक आहेत. त्यांच्या समोरील रस्ता खोदून ठेवला आहे. त्या रस्त्यासंदर्भात; रस्ता का थांबलेला आहे, त्याची चौकशी करून संबंधित ठेकेदाराला तत्काळ काम पूर्ण करायला सांगितले आहे.

– सौरभ होनमुटे,
सार्वजनिक बांधकाम अभियंता बार्शी

SCROLL FOR NEXT