सोलापूर

सोलापूर : विशाल फटे : बड्या हस्ती जाळ्यात; त्याचेही मार्केटिंग

Arun Patil

सोलापूर ; गणेश गोडसे : बिगबुल विशाल फटेचा नेट कॅफे ते शेअर मार्केट गुंतवणुकीचा अवघ्या पाच-सहा वर्षांचा प्रवास; पण अस्लखित इंग्रजी व संभाषण कौशल्याच्या आधारे आपण जणू या क्षेत्रातील बिझनेस टायकून असल्याचे भासवत त्याने 15-20 वर्षे या क्षेत्रात असल्याच्या बाता मारल्या. यातून काही बड्या हस्ती त्याच्या या मोहजाळात अडकल्या. त्याने त्याचेही मार्केटिंग करीत राजकीय, शासकीय एवढेच नव्हे तर प्रशासनातील बड्या अधिकार्‍यांनाही गुंतवणुकीच्या मोहात पाडले.

त्याच आधारे त्याने महाराष्ट्र, कर्नाटकात जाळे पसरवून कोट्यवधींचा फसवणुकीचा बाजार फोफावला. अपेक्षित माया गोळा झाल्यानंतर मात्र त्याने गाशा गुंडाळून पळ काढत सगळ्यांना धक्का दिला.

संगणकीय व कॉपी पेस्टचे इत्थंभूत ज्ञान प्राप्त करून घेतलेल्या विशाल फटे याने शेअर बाजारात पैसे गुंतवणूक केल्यास कित्येक पट जास्त परतावा मिळतो, असा भास निर्माण करण्यास सुरुवात केली. त्याच्या कॅफेत येणार्‍या तसेच त्याच्या संपर्कातील सर्वांना तो यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करून सांगू लागला. यासाठी जणू त्यांचा त्याने पिच्छाच पुरविला.

यातून एका जवळच्याच मित्रास शेअर बाजारात पैसै लावण्यास सांगितले. मित्राने लावलेल्या 70 हजाराचे विशालने एका महिन्यात 1 लाख रुपये परत दिले. त्यामुळे त्या मित्राचा विशालवर विशाल विश्वास बसला. त्यामुळे तो मित्रही जास्त पैसै कमवण्यासाठी जास्तीत जास्त पैसै विशालकडे देऊन गुंतवणूक वाढवत पैसै कमवू लागला. त्याच्या मित्राला पैसे मिळू लागल्याने त्याने त्याचा भाऊ, पै-पाहुणे, मित्रमंडळींमध्ये विशालच्या या कारभाराचे आपसूक 'मार्केटिंगच' केले. त्यामुळे विशालला आयता 'बकरा' सापडला.

त्या मित्राच्या माध्यमातून सुमारे पाच कोटींपेक्षा अधिक गुंतवणुका विशाल फटेला मिळाल्या. साहजिकच याचे लोण शहर, तालुका, जिल्हाभर पसरले. त्यामुळे त्याच्याकडे गुंतवणूक करणार्‍यांची गर्दी वाढू लागली. यातून अतिरिक्त पैसै असणारे धनदांडगे लोकही कमी कालावधीत जास्त पैसै मिळवण्याच्या आमिषाकडे आकर्षित होऊ लागले. साहजिकच याचे मार्केटिंग करण्यासाठी व्हिडिओ, सोशल मिडिया आणि विविध स्किमच्या माध्यमातून त्याने त्याचा चांगलाच डांगोरा पिटला.

पुढे -पुढे त्याने त्यासाठी पोलिस, शासकीय तसेच विविध क्षेत्रातील बडे अधिकारी, राजकीय व्यस्तींशीही ऊठबस आणि प्रसंगी त्यांच्याशी जवळीक वाढविली. त्यासाठी प्रसंगी काही कामांसाठी मदत, देणग्यांसारखे हातखंडेही त्याने वापरले. त्यामुळे त्या लोकांचाही विशाल फटेवर विश्‍वास वाढला. याचा फायदा घेत त्याने संबंधित अधिकारी, बड्या हस्तींनाही त्याने या गुंतवणुकांबाबत पटवून सांगून जाळ्यात ओढले.

अर्थात सहजसुलभ येणार्‍या पैशांची गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने त्यांनीही विशाल फटेचा मार्ग अवलंबला. पैशावर डब्बल पैशाचा मोह त्यांना सुटला अन् यातूनच पुढे लाखांचे आकडे बोलणारा विशाल फटे बार्शीचा हर्षद मेहताच बनला. तो कोटी अन् अरबो, खबरोच्या भाषा करू लागला. पुढे पुढे तर त्याने दहा लाखांच्या हात रकमाही घेणे बंद केले.

प्रशस्त कार्यालय थाटले;

अर्थातच बडेजावपणा करण्यासाठी त्याने अलिशान कार्यालयाचाही निर्णय घेतला. त्यातून त्याने शहरातील उपळाई रस्त्यावर एक प्रशस्त जागा ऑफिससाठी भाड्यावर घेऊन तेथे शेअर बाजारात ट्रेडिंग करण्याच्या धर्तीवर तीस संगणकांचे सुसज्ज 'मिनी वर्ल्ड ट्रेड मार्केट' कार्यालय तयार केले. शहरातील तरुणींना कार्पोरेट पद्धतीने कार्यालयात बसवून आपली उंची वाढविली.

पुढे त्याने शेअर ट्रेडींगच्या नावावर पैसै घेऊन ते लावण्यासाठी त्याने वेगवेगळया तीन कंपन्या स्थापन केल्या. त्यामध्ये तो पैसै लावत असल्याचा भास त्याने निर्माण करत होता. लोकांना आयपीओच्या माध्यमातून जास्त नफा मिळत असल्याचे सांगत त्याने दहा लाख गुंतवून वर्षाला 6 कोटींच्या मोबदल्याचे अशक्यप्राय स्वप्न दाखविले.

यामुळे दिवसागणीक लाखोंच्या गुंतवणुकीच्या राशी त्याच्याकडे पडू लागल्या. त्यासाठी त्याने आटपाडी, निपाणी, चाळीसगाव, ठाणे, पुण्यातही आपले जाळे पसरले होते. पुण्यात त्याने अलिशान ऑफसही थाटले. महाराष्ट्रातील क्षेत्र तोकडे पडल्याने कर्नाटकातही जाळे पसरविले अन् तेथेही आमदार, खासदार, मंत्र्यांसह अनेकजण त्याच्या फसवणुकीच्या जाळ्यात अडकल्याचे समजते.

पण जेव्हा त्याला अपेक्षित कित्येक कोटींची माया गोळा झाल्याचे लक्षात आले. तसेच आता रकमा परतीचे अशक्यप्राय असल्याचे लक्षात आले. त्यानंतर मात्र त्याने गाशा गुंडाळून पळ काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी दीड-दोन कोटी रुपये बँक खात्यावर ठेवत उर्वरित पैसे घेऊन त्याने पोबारा केला. इकडे तो गायब झाल्याची चर्चा सुरू होताच सर्वच गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले. त्याच्या कार्यालय, घराकडे हेलपाटे सुरू झाले. पोलिस ठाण्यात तक्रारींचा ओघ सुरू झाला. ते लक्षात येताच त्याने अवघ्या आठवड्याभरात व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपण साव असल्याचे सांगून नौटंकी रंगविली. अनेकांना पैसे मिळवून दिल्याच्या गप्पा हाकत आणि पत्नी, मुलांसमवेत आत्महत्येच्या विचारांचे भावनिक वाताण त्याने चित्रफितीतून व्हायरल केले. त्यानंतर पोलिसात स्वत:हून हजर झाला.

आलिशान बंगला, गाड्यांची भुरळ

विशाल फटेने शेअर मार्केटच्या गुंतवणुकीतून जणू पैशाचा पाऊस पाडत असल्याचे वातावरण निर्माण केले. त्यातून येणार्‍या रकमांतून त्याने जसे काही लोकांना व्याजासह पैसे परत दिले. त्याचे मार्केटिंग केले. पुढे जर कोणी पैसे मागितलचे तर आता पैसे काढू नका. पुढे त्यातून कित्येकपट पैसे मिळतील असे सांगू लागला.

त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी लोक त्याचे ऐकू लागल्याने पैसे परतीचा विषयच टळू लागला. साहजिकच हे लक्षात येताच त्याने आलिशान बंगला, कार्यालयापाठोपाठ महागड्या गाड्या खरेदी केल्या. त्या गाड्या शेअर मार्केटमधून आलेल्या पैशातून घेतल्याचे सांगत त्याचेही मार्केटिंग करून लोकांना भुरळ घालू लागला. त्यामुळे लोक अशा गाड्यांची स्वप्ने पाहू लागली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT