पुरस्कार 
सोलापूर

सोलापूर : मुख्यमंत्र्यांकडून माळशिरस तहसीलदारांचा गौरव

दिनेश चोरगे

पानीव;  पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र शासनाच्या 'सुंदर माझे कार्यालय' अभियानांतर्गत माळशिरस तहसील कार्यालयास प्रथम क्रमांक, तर मंडळ अधिकारी अकलूज कार्यालयास द्वितीय क्रमांक मिळाला. पुरस्कार वितरण समारंभ आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपस्थितीत पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर तसेच अकलूजचे मंडल अधिकारी सी. एस. भोसले यांचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र वितरित करून गौरव करण्यात आला.

या अभियानाचे मूळ उद्दिष्ट हे सामान्य नागरिकांना पुरवण्यात येणार्‍या विविध कार्यालयीन सेवांमध्ये भौतिक व गुणात्मक बदल करणे, कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी यांना दैनंदिन कामकाजाच्यादृष्टीने भौतिक संसाधने उपलब्ध करून त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करणे असून, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालय, मंडल अधिकारी कार्यालय, तलाठी कार्यालय यांना या स्पर्धेमध्ये दिनांक 15/02/2022 ते 30/04/2022 या स्पर्धा कालावधीत याअभियानात सहभागी होऊन नमूद केलेल्या सर्व मुद्द्यांची पूर्तता करण्याकामी सूचित केले. त्यानुसार माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनी हे अभियान तालुक्यातील तहसील कार्यालय, प्रत्येक मंडल अधिकारी आणि तलाठी कार्यालयामध्ये राबविण्याच्या अनुषंगाने सुविधा निर्मिती करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.

तालुक्याचे तहसील कार्यालय तसेच क्षेत्रीय कार्यालये असलेले मंडल अधिकारी आणि तलाठी यांच्या कार्यालयात आमुलाग्र बदल करण्याच्या अनुषंगाने अभियान कालावधीत प्रयत्न केले गेले. यामध्ये नमूद केलेल्या लोकाभिमुख घटक जसे शासकीय कार्यालयामध्ये कार्यालय स्वच्छता, रंगरंगोटी, बैठक सुविधा, पिण्याचे पाणी, शौचालय, लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत पुरवायच्या सेवांचे माहिती फलक, तलाठी यांचे शिवार माहितीचा कार्यक्रम आदी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्याचबरोबर कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी यांच्या कार्यालयीन कामकाजामध्ये गुणात्मक सुधारणा करण्याच्या अनुषंगाने कर्मचारी बैठक व्यवस्था, स्वतंत्र कपाटे, कर्मचारी यांचे आस्थापनाविषयक प्रलंबित कामकाज पूर्ण करणे, लॅपटॉप, कॉम्प्युटर, प्रिंटर, नेट सुविधा स्वतंत्ररीत्या उपलब्ध करून देणे विषयक कामकाज अभियान कालावधीत पूर्ण करण्यात आले.

याकामी तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच मंडल अधिकारी, तलाठी यांनी आपल्या कार्यालयाच्या बाबतीत पूर्ण क्षमतेने या अभियानाची अंमलबजावणी केली. त्याचेच फलित म्हणून अभियान कालावधीत केलेल्या कामकाजाचे विशेष पाहणी पथकाद्वारे केलेल्या पाहणीअंती जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या जिल्हास्तरीय समितीने तहसील कार्यालय, माळशिरस यास तहसील स्तरावरील प्रथम पुरस्कार घोषित केला आणि मंडल अधिकारी कार्यालय स्तरावरील द्वितीय पुरस्कार मंडल अधिकारी कार्यालय, अकलूज यांना घोषित केला.

पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर जगदीश निंबाळकर यांनी उक्त गौरव हा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, माळशिरसचे प्र. उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब समिंदर यांचे लाभलेले मार्गदर्शन आणि तहसील, मंडल, तलाठी स्तरावरील सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य व प्रयत्नांचे फलित असल्याची भावना व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT