सोलापूर

सोलापूर : मान्यतेसाठी दीड लाख, तर बदलीसाठी साठ हजार!

अनुराधा कोरवी

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात काम करणारा लाचखोर शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार प्राथमिक शिक्षकांच्या मेडिकल बिलासाठी तीन टक्के, शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेसाठी दीड लाख, शाळा मान्यता, अनुदान वितरणासाठी पाच टक्के रेट घेत असे. शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत तर साठ हजारांचा रेट निश्चित करण्यात आला होता, असा आरोप होत असून, तशा तक्रारी आता समोर येत आहेत.

आंतरजिल्हा प्रणालीने आलेल्या शिक्षकांना नियुक्ती देण्यासाठीही घरघशीत रक्कम डॉ. लोहार घेत असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, शिक्षण विभागाचा प्रत्येक कामाचा रेट फिक्सच असल्याने सर्वसामान्य शिक्षकांनी शिक्षण विभागात डॉ. लोहार याने निर्माण केलेल्या रेट कार्डला झुगारून जर कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर वेगळ्या मार्गाने दबाव आणण्यात येत होता.

ऑनलाईन बदली प्रणालीस हरताळ फासला

शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईनच केल्या जाव्यात, या राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमाला हरताळ फासत डॉ. लोहार ऑफलाईन बदल्या करून माया कमवत असे. दरम्यान, याप्रकरणी सविस्तर चौकशी करण्याची मागणी जि.प. प्राथमिक शिक्षक संघाचे माजी जिल्हाध्यक्ष शिवानंद भरले यांनी विभागीय आयुक्तांकडे केली
आहे.

विशेष म्हणजे, शिक्षक बदली प्रकरणामध्ये डॉ. लोहारमुळे सोलापूर जिल्हा परिषदेचा सामान्य प्रशासन विभाग, शिक्षण विभाग यांचे संगनमत असायचे, अशी माहिती पुढे आली आहे. ऑनलाईन बदल्यांचे शासनाचे धोरण डावलून काळ व वेळ न बघता डॉ. लोहार याने शेकडो शिक्षकांच्या बदल्या केल्या. या सर्व बदल्या 'अर्थपूर्ण' झाल्याची चर्चा होत असल्याचे भरले यांनी आयुक्तांना सांगितले आहे.

प्राथमिक शिक्षण विभागात सुमारे 400 ते 500 शिक्षक अतिरिक्त आहेत. त्यांचा पगार इतरत्र शालार्थ आय. डी.ला दाखवून या अतिरिक्त
शिक्षकांचे वेतन काढले जात असल्याचा प्रकारही आता पुढे आला आहे. यामध्येही डॉ. लोहारचा हात असल्याचे समजते. काही शिक्षकांच्या पूर्वी बदल्या होऊनसुद्धा ते बदलीच्या शाळेवर हजर होत नाहीत. त्याला या लाचखोर डॉ. लोहार याचे अभय असल्याची चर्चा आहे. यामुळे सामान्य शिक्षकांवर अन्याय होत आहे. डॉ. लोहारच्या या सर्व कारनाम्यामुळे शिक्षण विभाग बदनाम झाला
असून, त्याचा परिणाम शिक्षकांच्या मनोधैर्यावर झाला होता.

सोलापूरचा शिक्षणाधिकारी किरण लोहार 25 हजारांची लाच घेताना रंगेहाथ सापडला. त्या पार्श्वभूमीवर त्याच्या वादग्रस्त कारकिर्दीचा
पर्दाफाश करणारी ही वृत्तमालिका.

जादा घरभाडे लाटण्याचा प्रकार

ग्रामीण भागातील शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांची शहरी भागात सेवा दाखवून जादा घरभाडे भत्ता लाटण्याचे प्रकारही डॉ. लोहारमुळे झाले आहेत. या प्रकारामध्ये काही जणांची साखळीच निर्माण झाली होती. आता ते सारे गायब असल्याची चर्चा जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वर्तुळात सुरू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT