सोलापूर

सोलापूर : मरणयातनेत जगणं अन् मरणानंतरही पोरकेपण

अमृता चौगुले

सोलापूर : वेणुगोपाळ गाडी :  पूर्व भागातील एका आजारी अवस्थेतील बेवारस, निराधार वृद्धाला वाचविण्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. या वृद्धाच्या परगावी असलेल्या नातेवाईकांचा शोध घेण्यात कार्यकर्ते यशस्वी ठरले. मात्र नातेवाईकांनी असमर्थता दर्शविल्याने अखेर या वृद्धावर रविवारी तीन दिवसांनी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

नारायण लक्ष्मण यनगुंडी असे या वृद्धाचे नाव आहे. अंदाजे 70 वर्षीय हा वृद्ध गत अनेक वर्षांपासून बेवारस जीवन कंठीत होता. घरोघरी जाऊन भिक्षा मागून त्यावर तो गुजराण करीत होता. गत काही महिन्यांपासून हा वृद्ध आजारी पडला, मात्र उपचाराभावी आजार बळावतच गेला. परिणामी दिवसेंदिवस त्यांची प्रकृती क्षीण होत गेली. या अवस्थेतही हा वृद्ध भिक्षा मागतच आपले पोट भरत होता.
हैदराबाद रोड विडी घरकूलनजीकच्या रंगराजनगर येथील रहिवासी मुरली सोमा यांच्या घरी 25 मे रोजी कार्यक्रम होता. तिथे जेवणाची पंगत सुरू होती. ते पाहून हा वृद्ध अन्नाच्या आशेपोटी गेला. या वृद्धेची अवस्था पाहून सोमा यांना दया आली आणि त्यांनी या वृद्धाला जेवायला देऊन कौटुंबिक विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. पत्नी व मुलगा मरण पावल्याचे वृद्ध निराधार असल्याने सोमा गहिवरून गेले. प्रकृती खालावल्याने वृद्धाला अन्न गळ्यात उतरत नव्हते. त्यामुळे सोमा यांनी रुग्णसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते रुपेश भोसले यांना फोन करुन त्या वृद्धावर उपचाराची सोय करण्याची विनंती केली. यानंतर शासकीय रुग्णालयात या वृध्दाला दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना 2 जून रोजी वृद्धाचा मृत्यू झाला.

सोशल मीडियावर फोटो केला शेअर भोसले यांनी सोलापुरातील यनगुंडी नामक अनेक कुटुंबांशी संपर्क साधत मृत व्यक्तीच्या नातेवाईकाचा शोध घेतला. भोसले यांनी यनगुंडी यांचा फोटो नावासह सोशल मीडियावर शेअर केला. यावर तेलंगाणात राहणार्‍या वृद्धाचा नातू रवी याने भोसले यांना फोन करुन मृत व्यक्ती आपले आजोबा असल्याचे सांगितले. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने आपण अंत्यविधीला येऊ शकणार नाहीत असेही स्पष्ट केले.
दुसरीकडे पोलिसांनी वृद्धाच्या अन्य नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी अंत्यविधी तीन दिवसांनी करण्याचा निर्णय घेतला. यावर दोन दिवसांत कोणीच न आल्याने रविवारी (दि. 5) मृत नारायण यनगुंडी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे ठरले आहे. मन हेलावून टाकणार्‍या या गोष्टीची पूर्व भागात सर्वत्र चर्चा होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT