सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप मतदारयादी तयार करण्यात आली आहे. मतदारांची एकूण संख्या 8 लाख 9 हजार 537 इतकी असून गत निवडणुकीच्या तुलनेत 1 लाख 35 हजार 595 मतदारांची वाढ झाली असून वाढीचे प्रमाण 16.74 टक्के इतके आहे.
महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन प्रारुप मतदारयादीचा तपशील मांडला. मनपा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदारयादीत मेपर्यंत नोंदणी केलेल्या नवीन मतदारांचाही समावेश आहे. एकूण मतदार संख्या 8 लाख 9 हजार 537 इतकी असून यापैकी पुरुषांची संख्या 4 लाख 11 हजार 305, स्त्रियांची संख्या 3 लाख 98 हजार 146, तर इतरांची संख्या 86 आहे. निवडणूक आयोगाकडून सोलापूर शहर उत्तर, शहर मध्य व सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघाची मूळ यादी प्राप्त करून त्याआधारे मतदार यादीचे विभाजन करून प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत.
याठिकाणी याद्या प्रसिद्ध होणार
प्रारुप मतदार याद्या प्रसिद्धी गुरुवारी (दि. 23) रोजी महानगरपालिकेचे कौन्सिल हॉल विभागीय कार्यालय क्र.1 ते 8 सूचना येथे प्रसिद्ध तसेच महानगरपालिकेच्या ुुु.ीेश्रर्रिीीलेीिेीरींळेप.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करण्यात येणार आहेत. याशिवाय स्थानिक वृत्तपत्र, स्थानिक केबल टीव्हीवर प्रसिद्ध करण्यात येईल. प्रारुप मतदार याद्यांची विक्री निवडणूक मुख्य कार्यालय (डॉ.कोटणीस हॉल, आय.सी.आय.सी.आय. बँकेच्यावर) या ठिकाणी करण्यात येणार आहेत.
प्रारुप मतदारयादीवर हरकत घेण्यासाठी 23 जून ते 1 जुलपर्यंत मुदत राहणार आहे. अंतिम मतदारयादी 9 जुलैला प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
मतदारयादी तयार करताना लेखनिकांकडून झालेल्या चुका, एका प्रभागातील मतदार चुकून दुसर्या प्रभागामध्ये अंतर्भूत झाल्यास, वा संबंधित प्रभागातील विधानसभा मतदार यादीत मतदारांची नांवे असूनही महानगरपालिकेच्या संबंधित प्रभागाच्या मतदार यादीमध्ये नावे वगळण्यात आली असल्यास अशा मतदारांना हरकत घेता येणार आहे. पत्रकार परिषदेला अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, सहायक आयुक्त विक्रमसिंह पाटील उपस्थित होते.