सोलापूर

सोलापूर : बोंडलेत श्री संत तुकारामांचा धावा  

दिनेश चोरगे

श्रीपूर; सुखदेव साठे :  संतश्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात महत्त्वाचा समजला जाणारा धावा बोंडले (ता. माळशिरस) येथील उजनी कालव्याच्या उतारावर मोठ्या उत्साहात पार पडला. बोंडले येथील उजनी कालव्याच्या टेकडीवर पालखी सोहळा आल्यानंतर धावा होणार त्याठिकाणी पालखी सोहळा थांबविण्यात आला. सोहळाप्रमुख व चोपदर पुढे आले. त्यांनी दिंड्या लावल्यानंतर

तुका म्हणे धावा ।
आहे पंढरी विसावा ॥

हा अभंग झाल्यानंतर पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुर झालेल्या लाखो वारकर्‍यांनी टाळ-मृदुंगाच्या जयघोषात भक्तिमय व अत्यंत आनंदी वातावरणात वार्‍याच्या वेगाने देहभान विसरून पंढरीच्या ओढीने या उतारावरुन बोंडले गावाच्या दिशेने धाव घेतली. धावा उरकून श्री संत तुकाराम महाराजांची पालखी बोंडले येथे दुपारच्या विसाव्यासाठी विसावली. यावेळी बोंडले ग्रामस्थांकडून श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यास तोफांची सलामी देऊन पालखी सोहळाप्रमुखांना श्रीफळ, फेटा देऊन मोठ्या उत्साहात सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. दरम्यान, बोंडले येथे श्री संत तुकाराम महाराजांची पालखी विसावल्यानंतर बोंडले मुक्कामी असलेला श्री संत सोपानकाकांचा पालखी सोहळा पुढील प्रवासासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून मार्गस्थ झाला. यावेळी श्री संत सोपानकाकांच्या पालखीचा रथ व श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथा शेजारी आणून उभा करण्यात आला. यानंतर दोन्ही संतांच्या भेटी झाल्या. यावेळी दोन्ही पालखी सोहळाप्रमुखांनी एकमेकांना श्रीफळ देऊन भेट घेतली. बोंडले येथे एकाचवेळी श्री संत सोपानकाका, श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील लाखो वारकरी एकत्र आल्यामुळे टाळ- मृदंगाच्या व माऊली, तुकारामांच्या जयघोषामुळे आसमंत दुमदुमला होता.

पोलिस प्रशासनावरील ताण कमी

बोंडले गावातून राष्ट्रीय महामार्ग 965 व राष्ट्रीय महामार्ग 965 ग असे दोन राष्ट्रीय महामार्ग जात असून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीमार्गाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. बोंडले गावात उड्डाणपूल असून तो सुरू करण्यात आला असल्यामुळे बोंडले येथील जुन्या मुख्य चौकात वारकर्‍यांची गर्दी व वाहतूक कोंडी कसल्याहीप्रकारे झालेली नाही. यावर्षी वारकरी उड्डाणपुलावरून मार्गस्थ झाल्यामुळे पोलिस प्रशासनावरील वाहतुकीच्या कोंडीचा ताण कमी झालेला आहे.

व्यावसायिकांची कुचंबणा

उड्डाणपुलावरून मोठ्या प्रमाणावर वारकरी जात असल्यामुळे व सर्व्हिस रस्त्याने जाणार्‍या वारकर्‍यांचे प्रमाण अत्यल्प होते. परिणामी बोंडले गावातील व्यावसायिकांचा उड्डाणपुलामुळे व्यवसाय एकदम कमी झाला. त्यामुळे व्यावसायिकांची कुचंबणा झालेली पाहावयास मिळाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT