सोलापूर

सोलापूर : प्री-वेडिंग शूटिंगवर बंदीचा मराठा वधू-वर मेळाव्यात ठराव

दिनेश चोरगे

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  मराठा समाजातील मुला-मुलींचे विवाह करताना प्री-वेडिंग शूटिंग करू नये, असा ठराव मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित मराठा वधू-वर मेळाव्यात करण्यात आला. या ठरावाला सर्व समाजबांधवांनी एकमताने मान्यता दिली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी आणि शासनाला जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून दिले आहे. समाजबांधवांनी या ठरावाची पायमल्ली न करता प्री-वेडिंग शूटिंगला पायबंद घालावा, असा सूर यावळी निघाला.

मराठा सेवा संघ प्रणित मराठा वधू-वर कक्षाच्या वतीने रविवारी (दि. २८) शिवस्मारक सभागृहात वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर नांदेडचे पोलिस उपअधीक्षक बाळकृष्ण हनकुडे-पाटील, जय हिंद शुगरचे चेअरमन बब्रुवाहन माने-देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते… मेळाव्याला परिसरातील तब्बल ४०० ते ५०० वधू-वर, त्यांचे पालक हजर होते. यावेळी प्राथमिक स्वरूपात काही वधू तर काही वरांनी आपला परिचय करून दिला. परिस्थिती नसताना देखील कर्ज काढून प्री-वेडिंग शूटिंगवर लाखो रुपये खर्च केले जातात. वैयक्तिक खासगी फोटो सार्वजनिक करण्याची प्रथा रूढ झाली आहे. याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. प्री-वेडिंग शूटिंगवर येणारा खर्च गोरगरिबांच्या विवाह सोहळ्यासाठी आर्थिक मदत म्हणून देण्याचा सूर देखील या मेळाव्यात उपस्थितांनी आळवला. भविष्यात 'एक गाव एक विवाह' ही संकल्पना मराठा सेवा संघाच्या माध्यमातून पुढे आणली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT